Sunday, January 30, 2022

'बाबागिरी' न करणारा, तरीही सगळ्यांचा 'बाबा'

 #अनिल_अवचट गेले त्याला आज चार दिवस होतील. ते गेले त्या दिवशीच लिहायचं होतं खरं तर, पण काही वैयक्तिक व्यवधानामुळे नाही जमलं. लिहिलं तर पाहिजेच पण I owe him a lot.

साधारण वीसेक वर्षांपूर्वीची सोशलमीडिया पूर्व काळातली गोष्ट. आईमुळे वाचनाची भयंकर आवड, अगदी पुडीला बांधून आलेला कागद, रोजचा पेपर, चित्रलेखा,गृहशोभिका, चांदोबा काही म्हणता काही सोडायचो नाहीत आम्ही! हे सगळं पुरेना तेंव्हा मग लायब्ररी लावली सोलापुरातली तशी छोटीशी- संतसेवा वाचनालय असं टिपिकल नाव असलेली. तिथं कादंबऱ्या, कथा, चरित्रे वगैरे वाचायला सुरुवात केली, काही काही आवडायच्या, काही नाही. आणि मग तेंव्हा तिथंच पहिली भेट झाली अनिल अवचटांशी. पहिलं पुस्तक नेमकं कोणतं वाचलं हे आता आठवत नाही, पण जेंव्हा त्यांचं वाचणं सुरू केलं तेंव्हा जाणवलं, हे काहीतरी जबरदस्त गुंतवून ठेवणारं आहे, हाडामासाच्या जिवंत माणसाच्या, त्यांच्या दुःख, कष्ट, वेदना, सुख, समाधानाच्या गोष्टी. 

त्यांचं स्वतःविषयी, माणसं, अंधेरनगरी निपाणी, धार्मिक, धागे उभे आडवे, प्रश्न आणि प्रश्न अशी कितीतरी पुस्तकं वाचली. पुण्याचा जुना बाजार, मिरचीची आणि तिखटाची पोती उचलणारे हमाल कामगार, त्यांची अवघड जागची दुखणी, निपाणीतल्या अगदी 80 वर्षांच्या आजीचे लैंगिक शोषण करणारा मालकाचा तरुण मुलगा, अन्यायकारक जात पंचायती, त्यात पणाला लागणारी लोकांची आयुष्य, गावाबाहेर टाकलेले पारधी, वैदू, भटक्या जमाती, सफाई कामगार, सांगलीतल्या हळदीच्या पेवामध्ये काम करणारे मजूर किती जण! आपल्यासारख्या पांढरपेशांसाठी केवढी वेगळी दुनिया, किती टोकाचा अन्याय आणि तीव्र दुःख. या सगळ्यातून विचार यायला लागला की आपण आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यात ज्याला दुःख आणि कष्ट म्हणून कुरवाळतो ते खरंच दुःख आणि कष्ट असतात का? 

'धार्मिक' हे पण अवचट यांचं फार महत्त्वाचं आणि माझ्यावर प्रभाव असलेले पुस्तक. त्यातली शेकडो स्त्रियांवर त्यांच्या राजीखुशीने, पूजेच्या नावाखाली लैंगिक संबंध ठेवायला लावणाऱ्या वाघमारे बुवाची गोष्ट, बायकांच्या दाबून असलेल्या, न भागलेल्या लैंगिक भुका, डोक्यात जटा झाल्याने देवाला वाहिलेल्या देवदासी , गाणगापूरला अंगात येऊन उड्या मारणारे मनोरुग्ण भक्त, गालात जिभेत सळ्या खुपसून घेणारा शेखसल्ल्याचा उरूस. ' धर्म म्हणजे अफूची गोळी' हे कॉलेज मध्ये समाजशास्त्रात शिकण्याच्या किती तरी आधी या पुस्तकाने समजावलं होतं. नास्तिकतेकडे विवेकवादाकडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सदस्य होण्याकडे वाटचाल होण्यासाठी सुद्धा हे पुस्तक मला उपयोगी पडलं. आमचं लग्न ठरण्याच्या आधी, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने रुढीप्रिय घरातून आलेल्या माझ्या नवऱ्याला Ankur Anant Sheludkar  ला 'This is how religion exploits' असं लिहून मी भेट दिलेलं हे पहिलं पुस्तक.  आधीचा आणि आताचा अंकुर यात बराच फरक पडलाय, त्याला काही अंशी हे पुस्तक कारणीभूत असावं.


मुळात अश्या सगळ्या गोष्टींवर लिहिता येतं, हे लिहिण्याचे विषय होऊ शकतात हे बाबांनी दाखवून दिलं. 'रिपोर्ताज' हा पत्रकारितेतला प्रकार आमच्या पिढीसाठी मराठीत रुजवला तो अनिल अवचटांनी. दुसरं अतिशय साध्या- सोप्या, आपण जणू गप्पाच मारतोय असं लिहिण्याच्या त्यांच्या शैलीचा सुद्धा माझ्यावर खूप प्रभाव आहे. साधं सोपं, अनअलंकृत, कविता आणि शेरो शायरीने लदबडलेलं लिखाण / भाषण कधीच आवडलं नाही ते बाबांमुळेच.महाविद्यालयीन काळात सगळी भाषणं, निबंध आणि मग पत्रकारितेत आल्यावर लेखन ही जाणीवपूर्वक असंच ठेवण्यात बाबांचा आणि 'सकाळ' वृत्तपत्राच्या लेखनशैलीचा मोठा प्रभाव आहे. मुळात पत्रकारिता करावी, ही इच्छा मनात जगवण्यासाठी सुद्धा अनिल अवचट यांच्या लिखाणाचा, त्यांच्या विषयांचा मोठा वाटा आहे.

#नाही_रे' वर्गा विषयीचे लिखाण हा बाबांच्या लिखाणाचा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असला तरी मला सर्वात जास्त त्यांची प्रतिमा आवडते ती 'फॅमिली मॅन' म्हणून. 'सुनंदाला काही झालं की मी अस्वस्थ होतो पण मुलींना काही झालं की मी कोलमडूनच जातो' म्हणणारा त्यांच्यातला 'बाप', बायकोच्या पाळीच्या काळात तिच्यासाठी घरात कोमट पाण्याची बादली नॅपकिन तयार ठेवणारा, तिच्या आवडत्या निशिगंधाच्या फुलांची सजावट करणारा नवरा, डॉ. सुनंदा आणि डॉ. अनिल अवचट यांचं अनोखं , प्रेमाने भरलेलं सहजीवन, शिक्षणाने डॉक्टर असूनही, लिखाणाचा, पत्रकारितेचा वसा स्वीकारणारे, फिल्डवर जाणारे अनिल अवचट, आमच्या घरची ब्रेड विनर आणि पैसे कमावण्याची मुख्य जबाबदारी सुनंदावर आहे, हे न लाजता सांगणारा नवरा, मुलींसाठी घरात लहानपणी त्यांच्या उंचीचे स्विच बोर्डस करून त्यांना पाहिजे तितक्या वेळा बटणं चालू बंद करायला परवानगी देणारा बाबा, वेताळ टेकडीवर गेल्यावर 'बांगड्या वाजवल्या की वेताळ येतो' अश्या अंधश्रद्धेला भीक न घालता मुद्दाम बांगड्या वाजवणाऱ्या मुक्ता-यशो,  लहानपणी घरात येणाऱ्या घरकामगार तायांच्या भाषेत अशुद्ध ग्रामीण ढंगाचे मराठी मुलींना बोलायची मुभा देणारे, त्यांना समाज कळावा म्हणून मुद्दाम मनपाच्या शाळेत घालणारे, ,प्रत्येक वाढदिवसाला मुलींना एकमेकांना पत्र देणारे, आपण काय काम करतो ते मुलांशी रोज तासतासभर शेअर करणारे, मजा मस्ती करणारे अनिल अवचट आणि सुनंदा अवचट हे खरोखरीचे सुजाण आई बाप 💝

बाबांचे आणि त्यांच्या मुलींनी मिळून लिहिलेले सगळ्यात आवडते अतिशय छोटेखानी पुस्तक म्हणजे #सुनंदाला_आठवताना . पुस्तकातुन आपल्याला डॉ. अवचट कळले आहेत, पण डॉ. सुनंदा ही काय अचाट, अफाट बाई होती हे जाणून घ्यायला हे पुस्तक/ पुस्तिका मुळातून वाचायला हवी. अतिशय जीवनलालसेने भरभरून जगणाऱ्या डॉ. सुनंदा, अतिशय शिस्तीची गृहिणी, नवऱ्याला खोड्या काढून नकला करून चिडवणारी मैत्रीण, मेंटल हॉस्पिटलमधल्या पेशंटचे वाढदिवस शोधून साजरे करणारी आणि त्यांना फुलं देणारी माया करणारी आणि "पेशंट काय फक्त औषधानेच बरा होतो का? "असं विचारणारी संवेदनशील डॉक्टर , ही कथा आहे 'मुक्तांगण' मध्ये हेरखातं ठेवून ब्राऊन शुगरच्या पुड्या बरोबर पकडणार्या 'चतुर' व्यवस्थापकाची, स्वतःच्या पर्समध्ये नेलकटर ठेवून दिसेल त्या मुलांची नखं काढणाऱ्या डॉक्टरीण बाईची, कॅन्सर झालेला असूनही सतत उत्साहानं कामात राहणाऱ्या बाईची, केमोथेरपी चालू असताना त्या खोलीत सरोदची कॅसेट आणि ताजी फुले ठेवणाऱ्या नवऱ्याची, मुलींसाठी कपडे शिवणाऱ्या आणि वाढदिवसाला आवर्जून पत्र लिहिणाऱ्या 'वेड्या' पण शिस्तशीर आईची. पुस्तकाचं नाव आहे - सुनंदाला आठवताना . पुस्तक मुळातून वाचा, मस्ट आहे ते.

एक सांगायलाच हवं, डॉ. #सुनंदा_अवचट या अतिशय सक्षम आणि संवेदनशील Psychiatrist बाईंनी सर्वात प्रथम दारूच्या विळख्यात अडकलेल्या त्यांच्या मैत्रिणीच्या तरुण मुलाला , स्वतःची उपचारपद्धती वापरून बरं केलं. मग पु ल देशपांडे आणि सुनीता बाईंनी मोठी देणगी दिल्यावर '#मुक्तांगण' ही व्यसनमुक्ती साठीची पायोनिअर संस्था पुण्यात सुरू झाली. अर्थात या साठीची संस्था नोंदणी, आर्थिक व्यवहार, ट्रस्टी नेमणे अशी सगळी कामं करण्यात आणि व्यसनी मित्रांना माणसात आणण्यात अनिल अवचट यांनी मोलाची मदत केलीच. कित्येकांचे संसार वाचवले, त्यांना नवं आयुष्य मिळवून दिलं, हे डोंगराएव्हढं काम आजही तितक्याच कार्यक्षमतेने चालू आहे. यात बाबांचं नक्कीच श्रेय आहे, पण या संस्थेची संस्थापक म्हणून श्रेय डॉ.सुनंदा अवचट यांचंच. या पुस्तकात सुद्धा तसंच नमूद केलं आहे, आणि एकदा इंडियन मर्चंट ऑफ कॉमर्स चा पुरस्कार मुक्तांगण ला मिळाला तेंव्हा ते बाबांच्या नावावर जाहीर झालं, तेंव्हा बाबा लिहितात " मी वैतागलो आणि शरमलो देखील, हे काम सुनंदाचे असून मला का बक्षीस?" अर्थात स्टेजवर जाण्याचा फार उत्साह नसणाऱ्या डॉ. सुनंदा यांचा त्यावर आक्षेप नसे.. पण चार दिवसांपूर्वी बाबा गेल्यापासून अनेक चॅनेलवाले, पेपरवाले त्यांना बिनधास्त मुक्तांगणचे संस्थापक संचालक म्हणतायेत, मला खात्री आहे हे बाबांना पण नसतं आवडलं. आणि कितीही घासून गुळगुळीत झालेलं वाक्य म्हणायचं तर डॉ.सुनंदा यांच्या सारखी धीराची आणि कर्तृत्त्ववान जोडीदार, होती म्हणून महाराष्ट्राला डॉ.अनिल अवचट मिळाले.

त्यांचा प्रभाव एवढा होता की ते 'युक्रांद' कार्यकर्ते होते हे कळल्यावर, ते काम आवडल्यावर मी सुद्धा पुण्यात आल्यावर काही काळ 'युक्रांद' ची सक्रिय कार्यकर्ती होते. त्यांच्या मुळेच डॉ. कुमार सप्तर्षी यांची आणि कामाची ओळख झाली.एक उदारमतवादी राजकीय विचारसरणी तयार झाली.

बाकी आयुष्याच्या सगळ्या बाबतीत रमणारे, बासरी वाजवणारे, ओरिगामी करणारे, काष्ठशिल्प करणारे, स्वयंपाकात अत्यंत रुची बाळगणारे, वेगवेगळ्या वड्या उत्तम करणारे आणि मुख्य म्हणजे कुणाच्याही गुणांचे हात न राखता कौतुक करणारे 'बाबा' फार फार जवळचे आहेत.

तुम्ही आहात, असणार हे गृहितच धरलं होतं आम्ही! त्यामुळे श्रद्धांजली वगैरे म्हणवण्याचे धाडस करवत नाही.. एक बरं वाटतंय तुम्ही तुमच्या लाडक्या 'शोनाड' ला भेटू शकाल आता. बाकी पुस्तकातून तुम्ही कायम आमच्या जवळ असणार आहात बाबा, तिथून तुम्हाला कोणीच दूर  नाही करू शकत!

तुमच्या आप्तांना, भल्या मोठ्या विस्तारलेल्या परिवाराला Mukta Puntambekar  ताई, Yashoda Wakankar यांना या दुःखातून सावरायचे बळ मिळो. हे फार अवघड असणार, असा लाडका 'बाबा' गमावणे त्यांच्यासाठी 😢


जिथं जाल तिथं कायम खुश असा, #बाबा 💝


- स्नेहल बनसोडे शेलुडकर.