Sunday, November 14, 2010

तुम्हांला नाहीच जमायचं.....!

परवा दिवशी पिठल्यासाठी डाळीचं पीठ कालवायला घेतलं. अचानक आवाज आला, ''...तुम्हांला नाहीच जमायचं!'' मला काही कळेचना आवाज कुठुन येतोय ते ! कारण रुममध्ये मी एकटीच होते.च्यायला, आता आपल्याला एकटं असताना भास पण व्हायला लागले की काय, असा विचार करत असतानाच, पुन्हा आवाज आला '' खरंचय नाहीच जमायचं तुम्हांला...!'' पुन्हा आवाज..नीट पाहिलं तर आवाज येत होता डाळीचं पीठ कालवत असलेल्या भांड्यातूनच... !
'' कळलं का नाहीच जमायचं तुम्हांला, माझ्यासारखं सगळ्यात मिसळून जायला..कधी कधी तरीही स्वतःच अस्तित्त्व वेगळं ठेवायला..'' '' म्हणजे?'' '' मी किती वेगवेगळ्या पदार्थात सहज मिसळून जातो ,कित्ती वेळेला माझी गरज पडते तुम्हांला ! आत्ताचंच बघ...भाजीचा पटकन होणारा उत्तम पर्याय म्हणून वापरता ना ब-याचदा मला तुम्ही ?म्हणजे हा रोजचा पदार्थ झाला,पण अगदी खास म्हणवल्या जाणा-या पदार्थातही असतो मी..ढोकळा, मोहनथाळ, बेसनाचा लाडू, सुरळीच्या वड्या, म्हैसूरपाक हे पदार्थ माझ्यामुळेच ओळखले जातात. पण तरीही ब-याच भाज्यांमध्ये साईड आर्टिस्टचं कामही करतोच की मी – मेथीची, पातीची डाळीचं पीठ पेरुन केलेली भाजी, कढी किती नावं सांगू? शिवाय शेव, भजी,फरसाण या चमचमीत पदार्थांची माझ्याशिवाय कल्पना तरी करु शकता का तुम्ही ?’’
बेसन की बात सोचनेवाली थी....!!