Sunday, January 31, 2010

फुलपाखरू व्हायचं असेल तर ......

फुलपाखरू व्हायचं असेल तर ,
कोषात गुंतून थोडा काळ वेगळं व्हावंच लागतं .
आपल्याच रंगात रंगायचंय आपल्याला ,
हे मनाशी पक्कं करावं लागतं .
कोष तोडायला सुद्धा इतरांची मदत नाही घ्यायची ,
आपली लढाई आपणच लढायची .
पण फुलपाखराने इतकं सारं करूनही भागत नाही हो ,
कारण फुलपाखरं बघायची असतील ज्यांना ,
तर मग फुलं -पानं , किमान थोडी हिरवळ जपायचं भानही हवंच ना त्यांना !!

Friday, January 22, 2010

सोलापूरचे ४ हुतात्मे .


' जानेवारी ' महिना आम्हां सोलापुरकरांसाठी खूपच महत्वाचा असतो. या महिन्यातल्या दोन विशेष घडामोडी म्हणजे , एक म्हणजे संक्रांतीनिमित्त भरणारी श्री . सिद्धरामेश्वर यात्रा आणि दुसरं म्हणजे , हुतात्मा दिन. 'गड्डा ' यात्रेसंबंधी परत कधीतरी लिहीन . आज सोलापूरच्या ४ हुतात्म्यांविषयी :
माझ्या गावानं स्वातंत्र्यपूर्व काळात ३ दिवसांचं ' स्वातंत्र्य ' उपभोगलं होतं .शिवाय सोलापूर ' Muncipal Council ' (तेव्हाची , आता Muncipal Corporation ) ही स्वतःच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकवणारी देशातील पहिली Council आहे . १९३० मध्ये महात्मा गांधींना अटक ( बहुधा 'असहकार ' आंदोलनामुळे ) , झाल्यावर देशभर प्रक्षोभ उसळला , आंदोलनं , मोर्चे सुरु झाले .सोलापुरातही याचे जोरदार पडसाद उमटले होते .काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिकांनी निषेध नोंदवत सभा घेतल्या.पुण्याचे स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते ६ एप्रिल १९३० रोजी सोलापूर 'Muncipal Council ' वर राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात आला . दरम्यान मंगळवार पेठ पोलीस चौकीवर, सशस्त्र हल्ला करण्यात आला . पोलीस आणि सरकारी अधिकारी गाव सोडून पळून गेले .तेंव्हा , काँग्रेसचे तेंव्हाचे नेते तुळशीदास जाधव आणि रामकृष्ण जाजू इ.नी संपूर्ण कायदा, सुव्यवस्था सांभाळली होती .( ९-११ मे १९३० )हेच ते स्वातंत्र्याचे ३ दिवस .
नंतर सोलापूरमध्ये ' मार्शल लॉं ' लागू करण्यात आला .जमावाला भडकावणे , सशस्त्र हल्ला करणे , पोलीस अधिकाऱ्यांचा जीव घेणे असे आरोप ४ जणांवर ठेवण्यात आले .त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली . उच्च न्यायालयानेही तीच शिक्षा कायम ठेवली आणि १२ जानेवारी १९३१ रोजी चारजण पुण्यात फाशीवर चढवले गेले .हेच ते ४ हुतात्मे -
हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी ,
हुतात्मा किसन सारडा,
हुतात्मा कुर्बान हुसेन आणि
हुतात्मा जगन्नाथ शिंदे .
सोलापूरच्या पार्क चौकात या चौघांचे पुतळे आहेत . सोलापूरच्या रंगमंदिराचं , तसच सोलापूर -पुणे एक्स्प्रेसचं नाव या हुतात्म्यांवरून देण्यात आलं आहे .

Saturday, January 16, 2010

पुन्हा सुनीताबाई !

गेल्या आठवड्याच्या लोकसत्तेच्या 'चतुरंग' पुरवणीत डॉ. लता काटदरेंच्या लेखात सुनीताबाईची आणखी एक खूप चांगली आठवण वाचली . 'आनंदवनातल्या अंध , स्पर्शातून शिकणाऱ्या मुलांना , गुलाबाचा स्पर्श त्या फुलाला काटे असल्यानं अनुभवता येत नाही ' अशी खंत एकदा बाबा आमटेंनी सुनीताबाईसमोर व्यक्त केली होती .पुढच्या वेळेला आनंदवनात जाण्यापूर्वी , सुनीताबाईनी खूप शोधाशोध करून ' बिनकाट्याच्या ' गुलाबाचं रोप मिळवलं .आणि बाबांना ते रोप आनंदवनात लावण्यासाठी दिलं - अंध मुलं गुलाबाचा स्पर्श घेण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून !
इतक्या उत्कट संवेदनशील बाईला कुणी माणूसघाणी , कठोर म्हणत असेल तर ......च्यामारी मी बघतेच त्यांच्याकडे !
(अर्थात मी काय बघणार म्हणा ? पण आजकाल याच भाषेत बोललं जातं. म्हणून ....)

Saturday, January 9, 2010

सुनीताबाईविषयी - अंतर्नाद जाने . १०


' अंतर्नाद ' चा जानेवारी २०१० चा अंक जवळ - जवळ ' सुनीताबाई देशपांडे ' स्मृती विशेषांक म्हणता येईल . मंगला गोडबोलेंचा ' लखलखीत ' , प्रा. मिलिंद जोशींचा आणि सर्वोत्तम ठाकूरांचा असे तीन स्मृतिपर लेख आहेत .
यातला मला सर्वात आवडला तो - सुनिताबाईंच्या भावाचा - सर्वोत्तम ठाकूर यांचा ' आमची माई ' नावाचा लेख . लेख खरंच फार अप्रतिम आहे . ' सुनीताबाई ' नावाची कसली तेजशलाका होती - ते दाखवणारा !
त्यांच्या लहानपणाच्या आठवणींपासून -त्या कशा ४२ चा लढ्यात भाग घ्यायला बाहेर पडल्या , कायम स्वकष्टार्जित जीवन कशा जगत होत्या , कवितांवरचं प्रेम , भाईंच्या साहित्याचं documentation आणि perfection .अशा कितीतरी गोष्टी - काही लेखातलच उद्धृत करते .-
'' रत्नागिरीच्या पटवर्धन शाळेत माई शिकली .त्या शाळेवर तिचा खूप जीव होता .शाळेला १०० वर्षं पूर्ण होताना निधी जमवण्यात येत होता.तेंव्हा माईनं ताबडतोब एक वैयक्तिक धनादेश पाठवला - तो कुठल्याही दालनाला स्वतःचं नाव द्यावं म्हणून तो नव्हता .तो प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी आणि सोयींसाठी दिला होता ,इतर वेळेला दिलेल्या देणग्यात कुठंही आपलं नाव येऊ नये ,म्हणून सदैव दक्ष असणाऱ्या माईनं यावेळी मात्र आपल्या देणगीचा उल्लेख करणारा फलक लावायला सांगितला - हे पाहून दुसरेही देणगी देतील म्हणून , आणि घडलंही तसंच !
'' अशीच जगावेगळी वाटणारी मदत माईनं डॉ. प्रकाश आमटेंना पाठवली होती . हेमलकशाच्या त्यांच्या प्रकल्पात अनेक दुर्मिळ प्राणी आहेत -वाघ , साळीदर ,घुबडं इ. त्यांना सांभाळताना काही वेळा शासनानेही हे 'कृत्य बेकायदेशीर आहे ' असं म्हणून नोटीसा पाठवल्या होत्या . ' मानवेतर प्राण्यांच्या संगोपनासाठी ' म्हणून माईनं ५ लाख रुपयांची मदत पाठवली होती ."
'खरया गरजेला पुरेशी मदत ' हा दंडक असणाऱ्या सुनीताबाई , मदत देताना सखोल चौकशी करत .'पु. ल. देशपांडे फौंडेशन' , शेवटी विश्वस्त तित्यक्याच आपुलकीनं आणि काटेकोरपणे चालवतील; की नाही , ही शंका आल्यानं शेवटी त्यांनी ते फौंडेशन विलेपार्लेच्या 'लोकमान्य सेवा संघ' या विश्वासू संस्थेत विलीन केलं .
''प्रत्येक काम परिपूर्ण आणि सुंदर असावं , याविषयी माई दक्ष असायची .एकदा पाहुणे आलेले असताना , आम्ही डाळिंब सोलून देत होतो . दाण्यांवर जराही पातळ , पांढरा पापुद्रा राहू नये ,असं काळजीपूर्वक आम्हां दोघांचं काम सुरु होतं . मी कंटाळलो , पाहुणे दाणे न बघताच तोंडात टाकतील . मग इतका त्रास कशाला घ्या ? अशी कुरकुर केली . तेंव्हा माई म्हणाली ' मी डाळिंब हे असं सोलते , ते पाहून कुणी 'व्वा !' म्हणावं म्हणून नाही . दाण्यांना थोडीशीही साल असलेले दाणे , मला इतरांना द्यायला आवडणार नाहीत .मी दिलेली कोणतीही गोष्ट खराब असू नये असं मला वाटतं .' माईनं हे जन्मभर जपलं. ''
रद्दीवाल्या बाईसोबतचा किस्साही वाचण्याजोगा आहे , सगळच सांगत बसत नाही . लेख मिळवून तुम्ही वाचा . एक अत्रेंच्या शब्दात म्हणावसं वाटतंय ,'' असली जोडी गेल्या १० हजार वर्षात झाली नाही , आणि पुढच्या १० हजार वर्षात व्हायची शक्यता नाही !! ''.