Wednesday, December 23, 2009

त्या वर्षी - शांता गोखले

शांता गोखलेंची ' त्या वर्षी ' वाचली . बरीच आवडली . मला ' रीटा वेलिणकर ' पेक्षा ही जास्त आवडली .
एकूणच कलाकारांच्या आयुष्याबद्दल ही कादंबरी आहे , पण जोडीला 'तत्वनिष्ठा' प्राणपणाने जोपासणारे आणि ' अधःपतीत ' लोक , जगात घडणाऱ्या अनेक घटनांचा संवेदनशील माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम असं बरंच काही आहे . महत्त्वाचं म्हणजे कादंबरी कुठेही मेलोड्रामाटिक होत नाही , आणि सगळ्यात उत्तम परिणाम ( माझ्या मते ) याच गोष्टीचा झालाय . ( यामुळेच अनेक गोष्टी अगदी अंगावर आल्या उदा . ' काळ पहिला रे सख्या ' किंवा झुंडीनं घेतलेला सिद्धार्थचा बळी )
कादंबरीत वेगवेगळ्या पार्श्वभूमीची अनेक माणसं आहेत . शिक्षिका असणारी अनिमा , तिचा चित्रकार भाऊ अशेष , चित्रकार असणारे हरिदास , फिरोझ , पत्रकार जानकी, गायिका शारदा आणि तिचा नवरा शेखर . मला वाटतंय या कादंबरीला रुढार्थानं नायक / नायिका नाही - अगदी ठरवायचंच झालं तर ' काळ / नियती ' यांना मुख्य पात्र म्हणता येईल . या शिवाय अविवाहित राहून समाजसेवा करणारे बच्चुकाका , गांधी मंदिर उभारणारे अनिमाचे बाबा , गिरजी , पत्र १० वर्षं जपून ठेवणारा रामा सगळे कुठंतरी मनात घट्ट जाऊन बसलेत .
कादंबरीत अनेक संदर्भ येतात - आणि ते ज्या सहजपणानं शांताबाईनी गुंफलेत त्या बाबत तर hats off ! सनातनवाल्यांच्या कारवायांपासून , एम . एफ . हुसैनच्या चित्रावरील हल्ल्यापर्यंत आणि समलिंगी संबंधांपासून ते 'एलिट क्लास 'च्या पार्ट्यापर्यंत अनेक गोष्टी येतात . दुसरा कोणी लेखक असता तर . कदाचित ही ' ठिगळं ' च वाटली असती !
या कादंबरीत मला अनेक ' जागा ' सापडल्या - गाण्यात आपण दाद देतो ना अगदी तशा !
गांधी मंदिर पाडणं - आणि अनेक घटनांचा संदर्भ - जमावापुढे कोणीच काही करू शकत नाही , हाच असला तरी त्याचा त्रास होत होता .
इंग्लिशमध्ये ' sarcastic ' म्हणतात तो विनोद खूप ठिकाणी आहे .
शिवाय - जग राक्षसांच्या हाती गेल्यावर कलाकार काय करू शकतो ? - माणूस म्हणून आपल्यात काही सृजनशक्ती उरली आहे का - हे शोधून ती एकवटून निर्मिती करत राहणं - बस्स ! - हे भारी आहे !!
थोड्या खटकलेल्या गोष्टी - अनिमा , अशेष ही नावं आपल्या रोजच्या परिचयाची नाहीत ( पुढे अर्थात नावांचा संदर्भ येतोय ) , म्हणून नव्यानं वाचणार्याला ती दूर नेतील असं वाटतंय . कादंबरी कधी - कधी फारच ideologostic वाटते .
आणि मागे अवधूतनं सांगितलेलं - सांस्कृतिक सपाटीकरण पाहायला मिळालं , कारण या कादंबरीतली अनिमा जोशीसकट - जानकी पाटील , फिरोझ
बानातवाला हा पारशी इ. सारेजण ' केल्येय , गेल्येय !' असं कोकणस्थी बोलतात - ते थोडं मजेशीर वाटलं - बाकी पुस्तक झक्कास ! नक्की वाचा .
( ही कादंबरी शांता गोखलेंनी एका दीर्घ आजारात लिहिलीय - असं प्रस्तावनेत आलंय - पुन्हा एकदा बाई ( बापमाणूस आहे असं म्हणावसं वाटतंय ) Great ! )

Monday, December 21, 2009

परवा एका ट्रकच्या मागे एक वाक्य वाचलं -

नेहमी आपण वाचतो , '' बुरी नजरवाले तेरा मुं ( 'मुं' च - 'मुंह' असं पूर्ण लिहायचे कष्ट कुणी घेत नाही !) काला ! "
पण परवाच्या त्या ट्रकवाल्यानं लिहिलं होतं , '' बुरी नजरवाले तेरा भी हो भला !! "

Saturday, December 12, 2009

worth watching NCPA - Mumbai .


परवा कळत्या आयुष्यातल्या मुंबईचं पहिलं दर्शन घडलं . विद्याताईना ( विद्या बाळ ) UNFPA तर्फे ' जीवनगौरव ' पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने आम्ही ' साऱ्याजणी ' मुंबईला गेलो होतो .
पुरस्कार समारंभ नरीमन पोईन्टच्या ' राष्ट्रीय संगीत नाट्य कला अकादमी ' ( National Centre for Performing Arts ) च्या ' टाटा थिएटर ' मध्ये होता . NCPA बघणं हा एक अनुभव आहे . पाच थिएटर्स , पिरामल प्रदर्शन गलरी , मोठी पुस्तकांची आणि सीडीजची लायब्ररी ! अतिशय नेटकेपणानं सगळी रचना केलेली आहे . लॉन , दिवे , आसनव्यवस्था , समोरचं वाळलेलं चाफ्याचं झाड आणि समोर संपलेला रस्ता पुढे - समुद्र .
१९६९ साली NCPA ची स्थापना झाली - दक्षिण आशियातलं तेव्हाचं ते सगळ्यात मोठं सांस्कृतिक केंद्र होतं . भारतातल्या साऱ्या कलांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी NCPA ची स्थापना करण्यात आली होती . हे त्याचं उद्दिष्ट खरच कितपत प्रत्यक्षात उतरतंय, माहित नाही . पण दिग्गज्जांचे कार्यक्रम इथं होतात - पु , ल . चे एकपात्री कार्यक्रम , गिरीश कर्नाड , विजया मेहता , अल्काझी , उस्ताद शुजात हुसैन अशा साऱ्यांचे कार्यक्रम इथं झाले आहेत .संगीतावरचं संशोधनही इथं चालतं
शेवटी जाताना एकाच गोष्टीचं वाईट वाटलं - NCPA च्या मुख्य गेटवर म . न . से . चा झेंडा दिमाखात फडकत होता !!!

Thursday, December 10, 2009

एकेक मोती गळावया |


काल दिलीप चित्रे गेले , काही दिवसांपूर्वी सुनीताबाई गेल्या . अशीच एकेक सर्वाथानं उंच माणसं जायला लागली , तर इथं महाराष्ट्रात उरणार कोण ? - आपण आणि ठाकरे मंडळी !
हिंदी , मराठी ,इंग्रजी सर्व भाषात सहजतेनं वावरणारा हा माणूस ! खंडोबाच्या लोकगीतांच्या संग्रहापासून ,
'' बहुतेक पुढचं महाराष्ट्रगीत मी लिहीन ,
अटलांटिकच्या किनाऱ्यावर बसून , मुक्तलयीत ! "
काय शक्ती असते न एकेकाची - एका झटक्यात इतक ' ग्लोबल ' आणि इतक 'लोकल ' यांच्यात स्वीचओव्हर करणं काय सोपी गोष्ट आहे का ? तुकोबांना जागतिक पातळीवर नेले , ज्ञानदेवांच्या अनुभवामृताचा अनुवाद केला .काय आणि कसा घडला असेल हा माणूस ? दुसरा एक विचार मनात आला - काय देतो समाज या मनस्वी माणसांना ? त्यांचा मुलगा ' आशय ' भोपाळ वायूदुर्घटनेत जखमी झाला होता . श्रीराम लागूंचा मुलगाही रेल्वे मधून प्रवास करताना डोक्याला दगड लागून गेल्याचं मी ऐकलंय .
( वरच्या ओळी आणि बरीच माहिती ही - लोकसत्तेच्या सौजन्याने आहे. )

Monday, December 7, 2009

देती झाडं !

झाडांकडे कधी लक्षपूर्वक पाहिलंय - नाही म्हणजे वर्षानुवर्ष शिकत आलेलो , सावली देणारे , प्राणवायू देऊन आपल्याला जगवणारे , पाउस आणणारे - नजरेला सुख देणारे हे फायदे आहेतच . पण त्याशिवाय मला झाडं भावतात ती आपली मुळं घट्ट रोवून असणारी म्हणून ! ती उंचही वाढतात , पण बहुतेक झाडांची पानं मात्र जमिनीकडे झुकलेली - आपल्या मुळांकडे प्रेमाने पाहणारी ! कधी अंगावर फुलांचा पिसारा ल्यालेली , कधी फळ देणारी , कधी नुसत्याच खुळखुळ्या शेंगा देणारी , कधी नुसतीच हिरवीकंच - मला जगण्याच बळ देणारी ! अगदी वाळल्यावरसुद्धा कावळ्याला ' घरटं ' बांधायला जागा देणारी , कुरहाड चालवणार्यांच्या चुलीच इंधन बनणारी !
याउलट बरीच माणसं उद्दाम , स्वार्थी - दुसऱ्यांच्याच काय स्वतःच्याही मुळांवर , घाव घालायला मागेपुढे न बघणारी , खोट्याच्या पायावर दात विचकत उभी राहणारी !

लेडी लंपन - इओ .

प्रकाश नारायण संतांच्या लंपनच्या तशी मी प्रेमात आहेच . पण परवा एक रशियन कथा वाचताना , अचानक मला ' लेडी लंपन ' भेटली .( खरतर १६ वर्ष या तिच्या वयाला ' लेडी ' हा शब्द न पेलवणारा ! ) व्हलेन्तिनो रास्पुतिन नावाच्या सायबेरीअन लेखकाची ही गोष्ट . ' पालकनीती ' च्या दिवाळी अंकात उज्ज्वला बर्वेंनी या कथेचा अनुवाद केला आहे .( लगेच कथा वाचण्याचं हे आणखी एक कारण ! )
कथेच नाव आहे ' रुदोल्फ़िओ ' - इओ नावाची मुलगी २८ वर्षांच्या रुदोल्फच्या प्रेमात पडते . तो तिचा ट्राममधला सहप्रवासी असतो . पहिल्याच भेटीत त्याच नाव ऐकल्यावर , खो खो हसत ती म्हणते , " रुदोल्फ - मला वाटत असल नाव फक्त हत्तीच ठेवत असतील " . इओचा धीटपणा , निरागसता , मोठ्या लोकांप्रमाणे प्रसंगाला साजेस न वागता - मनातल बोलून टाकण्याची सवय सारच मुळातून वाचण्यासारख आहे . उदा . रुदोल्फच्या बायकोच नाव ऐकल्यावर ती झटकन म्हणते " क्लाव्हां - भुईला भारय नुसती " किंवा पहाटे ५ वाजता फोन करून ती त्याला सांगते - '' आता तुझ नाव ' रुदोल्फ़िओ ' - आता आपण एकत्र झालो तू पण ' रुदोल्फ़िओ ' आणि मी पण ' रुदोल्फ़िओ ' ! " किंवा " तिला सांगू नकोस हं - मी इथे आले होते ते , मला वाटतंय तिला माझा हेवा वाटतो "
आणि शेवटच , दोन्ही पायांना घट्ट मिठी मारून , पलंगावर मागे -पुढे झुलत , रागाने - " तू कसला ' रुदोल्फ़िओ ' ? तू तर नुसता रुदोल्फ ; साधा , अतिसामान्य रुदोल्फ !! " या कथेतला रुदोल्फ ही खूप समजूतदार , सभ्य माणूस दाखवलाय . साम्यवाद्यांच्या रशियाची इतकी हळवी , कोवळी बाजू - माझ्या साठी नवीच होती .
सगळ्यात महत्त्वाच म्हणजे पोरवयातल्या वेड्या प्रेमाची , मुलीची असलेली कथा मी पहिल्यांदाच वाचली आणि मला ती ' जाम ' आवडली .
ता . क . कोणालाही ही कथा ऐकायची असेल तर मी उत्सुक आहे - सांगायला !