Tuesday, May 18, 2010

'आंबट'शौकिनांसाठी ......

आपल्या एका आवडीच्या विषयाकडे मी गेले बरेच दिवस दुर्लक्ष केले आहे, असे माझ्या लक्षात आले.आणि मग काहीतरी उपाय तर करायलाच हवा , म्हणून मग ही पोस्ट- माझ्यासारख्या 'आंबट'शौकिनांसाठी...शिवाय प्रतिक्रिया म्हणून तुम्हीही काही पाककृती इथे add करू शकता. चविष्ट अश्या या पदार्थांच्या यादीत 'अग्रपूजेचा' मान मी सोलापूरच्या पाणीपुरीला देईन . सोलापूरसारखी अप्रतिम पाणीपुरी जगात कुठेही मिळत नाही. अतिशय टेस्टी ,स्वस्त आणि मस्त अशी ही गोष्ट. काळ्याशार माठातले थंडगार आंबट- गोड पाणी, कुडकुडीत पुर्या, शेव आणि हिरवी कांदापात.( पुण्याच्या पाणीपुरीला मला पाणीपुरी म्हणवत नाही, उकडलेले वाटाणे, बटाटा आणि देव जाणे काय- काय भरलेले असते त्याच्यात.. ) बस इतके भारी लागते ना हे प्रकरण. ते तसलं ultimate चवीचं पाणी फक्त सोलापूरचे पाणीपुरीवालेच करू शकतात - ५ रु.ला एक प्लेट,वर पुन्हा नुसतं पाणी ओरपायला फुकट ...सोलापूरच्या पार्क चौकात (तोच ..तोच हुतात्म्यांच्या पुतळ्याच्या चौक) एक मिनी चौपाटी आहे, तिथे प्रवेश करताना पहिलं दर्शन या पाणीपुरीच्या ठेल्यांचच घडतं. तेंव्हा कधीही सोलापूरला आलात तर पाणीपुरी खायला विसरू नकात.
आता कैरीच्या काही पाककृती:


मेथांबा :
साहित्य: एक कडक कैरी, अर्धी वाटी गूळ, तेल , १ टी .स्पू. जिरे, दीड टी . स्पू.मेथ्या , चवीपुरते मीठ आणि अर्धा टी .स्पू. तिखट ( ऐच्छिक ).
कृती : सोप्पी पटकन होणारी (आणि पटकन संपणारी ही पाककृती) . कैरी धुऊन, पुसून तिचे साल काढा.बोटाच्या पेराएवढे, छोटे -छोटे तुकडे करा. गूळ चिरून घ्या. कढई पुरेशी तापली की, त्यात २ टे.स्पू. तेल ओता, ते तापले की लगेच त्यात जिरे आणि चिमुटभर हिंग टाका. त्या नंतर मेथ्या टाका,त्या तेलावर खरपूस होऊन तरंगू लागल्या की, गूळ टाका, मंद आचेवर तो विरघळू लागला की कैरीचे तुकडे आणि मीठ टाका. डावाने अधून मधून हलवा. गरज पडल्यास थोडेसे पाणी टाका. हवे असल्यास तिखट मिसळा. साधारण १० मिनिटात हे शिजेल.(कैरी थोडी मऊसर व्हायला हवी) मग गार झाल्यावर एका स्वच्छ कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत मेथांबा भरा. पोळी, ब्रेड ,खिचडी कशाहीसोबत अतिशय मस्त लागतो.
हा फ्रीजशिवायही ५ दिवस टिकतो(मात्र तेंव्हा त्यात पाणी नको) .मेथांबा काढताना कोरडा चमचाच वापरा .मेथ्यांची कडवट चव लागत नाही,उलट खूप मस्त लागतो.

कैरीभात :
साहित्य : १ वाटी तांदूळ (शक्यतो इंद्रायणी/आंबेमोहोर/ बासमती ) , अर्धी वाटी कैरीचा कीस, चवीपुरते मीठ आणि साखर, २ टे.स्पू .तेल , फोडणीचे साहित्य, ३ उभ्या चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, मुठभर चिरलेली कोथिंबीर, मुठभर शेंगदाणे / डाळे (ऐच्छिक ).
कृती : हा नागपूरकडे केला जाणारा पदार्थ. प्रथम तांदूळ निवडून, धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवताना अर्धा टी. स्पू .तूप आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळा. भात मोकळा होण्याकरिता हे आवश्यक आहे.मग भात शिजला की बाजूला काढा. एका कढईत तेल तापवून मोहरी , हिंग, जिरे, कढीपत्ता, मिरच्या यांची फोडणी करा. फोडणीत हळद टाकू नका, करपू देऊ नका, हवे असल्यास दाणे / डाळे टाका, हलवा. मग शिजलेला भात त्याच्यात टाकून मंद आचेवर परतवा. मग मीठ आणि किंचित साखर टाका. कैरीचा कीस मिसळा पुन्हा तीन मिनिटे मंद आचेवर शिजवा. मग उतरवून त्यावर कोथिंबीर टाका.(फार आंबट आवडत नसल्यास पाव वाटीच कैरी घ्या,शिवाय लिंबू रसही आहेच.)