Friday, September 23, 2011

मी पाहिलेली छटाक मुंबई..

मी पाहिलेली छटाक मुंबई
मोठ्या मनाच्या थोड्याच माणसांची,
प्रचंड प्रॅक्टिकल आणि उतू जाणाऱ्या श्रीमंतीची,
लिटरली गगनचुंबी टॉवर्सची आणि क्लासिक आर्किटेक्चरल इमारतींची,
चाळींची, वन रुम किचनमधल्या दिमाखदारपणाची आणि
फुटपाथवर झोपणाऱ्या ,एक घोंगडं-ताट-तांब्या एवढाच संसार असणाऱ्या म्हातार आजीचीही,
9.53 वगैरे मला कधीच न पकडता येणाऱ्या लोकल्सची,
मुंबईत चहा चक्क पार्सल मिळतो आणि शहाळंही...!!
लोक समोसा-पाव, भजी-पाव खातात
सरदारच्या पावभाजीसाठी, प्रकाशच्या वड्यासाठी आणि भरतक्षेत्रमधल्या साड्यांसाठी चक्क रांगा लावतात.
मुंबईत गोष्ट सुंदर, भारी, ग्रेट नसते तर ती 'सेक्सी' असते..
मुंबई कष्टकऱ्यांची-
रेल्वे लाईनच्या मध्ये राखलेल्या छोट्या तुकड्यांवर चक्क भाज्या पिकवणाऱ्यांची,
रानभेंडी, रेन ट्री, पेल्टाफोरम आणि मध्येच वाकलेल्या केळींचीही....
मुंबई घाणेरड्या हवामानाची, तिखटा-हळदीला बुरशी लागण्याची,
धाडकन अचानक कोसळणाऱ्या पावसाची
मग हापिसात थ्री-फोर्थ पँटी घालण्याच्या फॅशनीची
आणि त्या पावसातल्या वाफाळणाऱ्या मॅगीची
कायम शेवाळलेल्या भिंतींची..
आणि मला आवडणाऱ्या व्हायब्रंट कलर्सनी रंगवलेल्या
'हम पंछी इक तार के' वगैरे लिहिलेल्या क्रिएटिव्ह भिंतींचीही !
(बहुधा लोकांनी लघवी करु नये म्हणून...)

मुंबईचे सगळे आमदार, नगरसेवक 'कार्यसम्राट' असतात,
म्हणूनच कचराकुंड्या भरभरुन वाहतात, गटारी तुंबतात, माणसं मरतात
मुंबईतली माणसं कायम पैश्यांविषयी बोलतात
आणि सोनचाफ्याची फुलं घेताना मात्र भाव करतात...

मुंबई प्रचंड व्हरायटीची, सोयी सुविधांच्या सुकाळाची
साध्या मिरच्यासुद्धा सहा-सात प्रकारच्या मिळण्याची,
माझ्यासाठी मुंबई म्हणजे,
प्रवासाचं कधीच न वाटणारं 'डेस्टिनेशन'
कामाच्या ठिकाणी सुमारांची सद्दी,
अर्ध्या हळकुंडानं जेजुरी झालेल्या माणसांची गर्दी,
च्यायला 'क' च्या बाराखडीनं माझ्या डोक्याची होणारी मंडई,
शीण घालवणारा लाडका समुद्र,
कोपऱ्यावरचा चाफा पाहून कुणाची तरी आठवण येणं.......
कधीच वेळेवर न होणारं जेवण,
ड्यूटी संपवून भाग भाग डी के बोस करत गाठावी लागणारी लायब्ररी,
अंगणात गेल्यासारखी दर आठवड्याची दादरची फेरी,
फुटाणे खाउन लाडावलेली कबुतरं आणि कर्कश्श कावळे,
मुंबई विझलेल्या गिरण्यांच्या चिमण्यांची,

मुंबई म्हणजे भर समुद्रात उभी करुन ठेवलेली वरळी - वांद्रे सी लिंक ची सतार,
मुंबई भिकबाळी घातलेल्या गणपती बाप्पाची,
देवनारच्या TISS मधल्या दृष्ट लागण्याजोग्या शांततेची,
मुंबई जिथं बसमधल्या लेडिज सीटवर पुरुष कधीच बसत नाहीत...
मुंबई ट्रेनमध्ये भजनं म्हणणाऱ्या, गणपती बसवणाऱ्या , गटारी साजरी करणाऱ्या उत्साही जनतेची,
मुंबई साईबाबांच्या भक्तांची,
मुंबई घरं नसलेल्या कित्येकांची,
वाहणाऱ्या कचराकुंडीत उभारुन पाव शोधणाऱ्या पोराची,
रक्ताळलेल्या माथ्याचं पोर घेउन स्टेशन-स्टेशनवर भीक मागणाऱ्या आईची
ताई, घरची आठवण येतीय म्हणून भर ट्रेनमध्ये माझ्यासमोर रडणाऱ्या बांगड्या विकणाऱ्या -बोटभर चिंधीची
आणि काहीच न करु शकणाऱ्या हताश माझीही.......







Monday, March 14, 2011

Love each other or perish - W.H.Auden.

''जो पर्यंत आपण इतरांवर प्रेम करत असतो आणि ती प्रेमभावना आपल्या मनात ताजी असते, तोपर्यंत आपण मेलो तरीही त्यांच्या पासून दूर जाऊ शकत नाही. आपण निर्माण केलेलं प्रेम त्यांच्या सोबत राहतंच . आपल्या आठवणी राहतात. आपण जगताना ज्यांना -ज्यांना प्रेमळ स्पर्श केला, पोषण केलं, शिकवलं, त्या प्रत्येकाच्या हृद्यात आपलं अस्तित्त्व असतं.''
- from Tuesdays with Morrie - Mitch Albom
यानंतर मी फक्त 'आमेन' म्हणू इच्छिते.

Friday, February 25, 2011

आजीजवळ जाऊन सगळी बडबड आणि तणतण मी केली,
माझं बोलणं ऐकून, माझे डोळे पुसून, पाठीवर हात फिरवत
आज्जी फक्त एवढंच म्हणाली,
''पोरी, आयुष्य असंच असतं''
समजूत पटल्यासारखी शांत होऊन मी खोलीच्या बाहेर पडले
तर ती हमसून -हमसून रडू लागली....
तेव्हा मी ही इतकंच म्हणाले,
''आज्जी, तू तरी कुठं सरावलीएस अजून आयुष्याला ?''