Thursday, March 18, 2010

....म्हणे साधा कारकून माणूस!

त्यांनी मला बसायला खुर्ची वगैरे दिली
( तिसर्यांदा भेटायला गेलो होतो ना! )
स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी,
मी दिलेलं पाकीट हातात घेतलं.
(वा! अगदी खरं सांगतो, अगदी धन्य-धन्य वाटत होतं. )

माझी साधी फुलस्केपाची पानं हाती धरून,
चष्म्याच्या आडून डोळे बारीक करून
माझ्याकडे बघत 'संपादकसाहेब' म्हणाले,
"हं...मग काय, कुठल्या चळवळीत वगैरे काम करता तुम्ही?"
"चळवळ ...छे..छे.. मी कुठल्या चळवळीत वगैरे नाही."
''मग डाव्या, समाजवादी विचारांचे वगैरे असाल!"
''हं.. म्हणजे तसं वाचतो बऱ्यापैकी मी,
पण त्या विचारांचाच आहे, असं नाही हो म्हणू शकणार."
"अच्छा..मग पर्यावरणवादी असाल, नाही का?"
''तसं ..आवडतं मला झाडापेडात राहायला,
पण म्हणून काही लगेच मी पर्यावरणवादी होत नाही ना!"

मग हळू आवाजात त्यांनी मला विचारलं,
"काय एखादी बडी जाहिरात देताय वाटतं आम्हांला?"
"छे हो साधा कारकून माणूस मी, मी कुठून देणार बडी जाहिरात?
हं.. लिहिण्याबद्दल म्हणत असाल तर, बरं वाटतं लिहिल्यावर म्हणून लिहितो हो मी!" - इति गोंधळलेला मी.

"ठीकाय. राहूदेत मग हे आमच्याकडे. या तुम्ही!"
"धन्यवाद . निर्णय कळवाल ना ."
"हां ..बघूयात.." -माझ्याकडे शक्य तितकं दुर्लक्ष करत संपादकसाहेब.
मी दरवाज्याबाहेर पडलो.
"लईच आम आदमी दिसतोय हा !
कशासाठी छापायचं याचं साहित्य ?"- इति इतका वेळ गप्प बसलेले दुसरे संपादकसाहेब.

"हो ना आडनावावरनं हा काही दलित वगैरेही वाटत नाही"
"हो ..रे मुस्लीम, अल्पसंख्याक ...किमान बाई असला असता ना तरी छापलं असतं याचं लिखाण!"
"आपल्या संपादकाला नाही उद्योग ...नसता झंझट स्साला..
काय आमचा मेव्हणा आहे की काय .. याला प्रत्यक्ष भेटायला?"

"encash तरी कसं करायचं याला - म्हणे साधा कारकून माणूस! "