Saturday, March 16, 2013

गंधवेड..

मला ज्ञानेंद्रियं ही फक्त ज्ञानेंद्रियं वाटतच नाहीत,
कधीच,
मला ती रसनेंद्रियं वाटतात...
आयुष्यावर प्रेम करायला भाग पाडणारी...
तर त्यात आपली सर्वाधिक गट्टी आहे ती 'घ्राणेंद्रिया'शी म्हणजेच नाकाशी...
मी गंधांवर जाम फिदा आहे,
नाक उंचावून मनापासून खोलवर तो गंध साठवायला आतुरणारी...
ते प्रत्येक वेळी 'सो कॉल्ड' सुगंध नसतात,
वासच असतात साधेसे,
पण ते अनुभवल्यावर काय वाटतं ते शब्दात नाही मांडता येत....

जसं की गंध आमच्या सोलापूरच्या 'हुतात्मा स्मृती मंदिर'चा तो गंध आणि 'हुतात्मा' हे समीकरण डोक्यात इतकं पक्कं आहे की तो वास नाही आला तर मी 'हुतात्मा'मध्ये आलीय असं वाटतच नाही....

दुसरा वास धुराचा म्हणजे 'I am crazy for Smoke.' असं म्हटलं तरी चालेल इतका आवडतो धूर...
लाकडं, पालापाचोळा, कागद, फटाके पेटवल्यावर येणारा, चुलीतून येणारा धूर अगदी सगळं-सगळं-
equal to heaven.(Please note- सिगरेटचा धूर आवडत नाही)

तिसरा अतिप्रिय गंध अर्थातच सोनचाफ्याचा- हे दैवी फूल आहे आणि मी त्याच्या गळ्यापर्यंत प्रेमात आहे.
चौथा वास मृदगंधाचा- उन्हानं रापलेल्या कोरड्याठाक भुईवर जेव्हा पावसाचा थेंब पडतो, किंवा आपण सडा टाकतो तेव्हा जमिनीच्या पोटातनं जो तृप्तीचा हुंकार येतो...तो मृदगंध कुणाला आवडत नसेल?

पाचवा वास आमच्या ऑफिसजवळच्या उदबत्तीच्या दुकानाचा....रोज घरी परतताना मुद्दाम फुटपाथवर चढून,अस्मादिक त्या दुकानासमोरुन हळू-हळू चालत तो वास साठवून घेतात... :D

सहावा वास - शिकेकाईचा, विकतची नव्हे, घरी तयार केलेली दळलेली , जाडसर- शिकेकाई, उटणं, फक्त दिवाळीतच ज्यांचा वास आवडतो ते सुगंधी तेल, मोती, म्हैसूर सँडल साबण, बाकी जगातल्या कुठल्याही सेंट-डिओचे वास आवडत नसले तरी बाबा वापरतात ते सेंट- त्याचा वास आपल्या आवडीचाच...

डांबर गोळ्या आठवतात कुणाला? आपल्याला लै आवडतो त्याचा वास...रॉकेल, फिनेल, पेट्रोलचा वासही आवडता...

वास जुन्या कपड्यांचा, वास आजीची आठवण करुन देणाऱ्या जुन्या गोधडीचा, जुन्या पुस्तकांचा, नव्या-कोऱ्या वह्या-पुस्तकांचाही, सिंथॉलचा वास आणि बार्शीचं माझ्या अप्पा मामाचं घर हे समीकरणही डोक्यात पक्कं...वास कापुराचा, वास वाळ्याचा , कुलर नुकताच सुरु केल्यानंतर येणारा विशिष्ट वास...वास मोगऱ्याच्या गजऱ्याचा , वास मोगऱ्याचं फूल माठात टाकलेल्या पाण्याचा.....

स्वयंपाकाशी निगडित वासांची किती वर्णनं करावीत- गॅसवरच्या भाकरीचा वेगळा, पोळीचा वेगळा, चुलीवरच्या खरपूस भाकरीचा, थालिपीठाचा वेगळा,मसालेदार वांग्याच्या भाजीचा, वास तेलात आत्महत्या करणाऱ्या आलं-लसूण-कोथिंबीर-कडिपत्त्याचा, ताज्या दळलेल्या कॉफी बीन्सचा, पाकिट फोडून नुकत्याच बाहेर काढलेल्या चहापावडरचा, इंद्रायणी भाताचा, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा,गरम भाजलेल्या कणसाचा,  ताज्या पुदिना- लिंबाचा, कढवलेल्या खमंग तुपाचा, आईनं तुपावर भाजलेल्या बडिशेपेचा, खमंग बेसनाच्या लाडूचा, आमच्या सोलापुरातील 'अय्यंगार बेकरी' च्या गरमा-गरम ताज्या खारीचा...(बऱ्याचदा मी कॉर्नरवर गाडी थांबवून तो वास साठवून घेते..गरमागरम पिळ खारी ही तिथली स्पेशालिटी...असो.)

नुसत्या उदबत्त्यांच्याच वासांच्या सेक्शनचे माझ्या डोक्यात हजार कप्पे आहेत...आमची फेव्हरेट पंढरपूरची ओली मसालावाली 'डेक्कन क्वीन' अगरबत्ती...सोलापूरच्या 'पुणेकर कामठे रसपानगृहा'त बाबा जातात ते उसाचा रस प्यायला आणि मी तिथल्या खास उदबत्तीचा वास घ्यायला..कधी तरी अचानक कुठून तरी वास येतो..तो असतो डिट्टो आमच्या आहेरगावच्या अंधाऱ्या देवघरात आजीनं लावलेल्या उदबत्तीचा...वास धूपाचा-उदाचा, मुसलमान फकीर जाळतात तो स्पेशल धूप वेगळाच...

गंधवृत्ती जागृत असल्या की जसे उत्तम वास लगेच जाणवतात तसंच दुर्गंधांचा त्रासही लगेच होतो...भरभरुन वाहणाऱ्या कचरापेट्या, गटारं, खिडक्या-दरवाजे बंद करुन ठेवणारी कोंदट घरं...मुळ्या-शेपूचा उग्र वास, अंडा आम्लेट, माशांच्या टोपलीचा मला सहन न होणारा वास...यड्यासारखे उग्र वासाचे डिओ-स्प्रे-सेंट फवारणारे लोक, सार्वजनिक जागी सिगरेटी फुकून दुसऱ्याचा जीव नकोसा करणारे लोक नकोसे होतात...जाऊ दे वाईट आठवणी नको काढायला...

गंधांच्या लिंक फार स्ट्राँग असतात...बऱ्याचदा त्या आठवणी घेऊनच येतात....

Thursday, January 31, 2013

तरीही येतो वास फुलांना.....

  तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असता ते तुमचे वडील तुमच्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर कारस्थान रचून बेछूट गोळीबारात मारले जातात...तुमची आत्या आणि काकाच त्या देशाचं सरकार चालवत असतात.. या गोळीबारापाठीमागे तेच आहेत हे ही तुम्हांला माहीत असतं..तुम्ही काहीच करु शकत नाही...तुमच्या वडिलांचे मारेकरी निर्दोष सुटतात..इतकंच काय त्यांना देशाची सेवा केल्याचं शौर्यपदकही दिलं जातं ...तुम्ही काहीच करु शकत नाही...

फ्लॅशबॅक-
शाहनवाझ भुट्टो आपल्या मुलाला सांगतात ''बाळा राजकारण हे कविता लिहिण्यासारखं किंवा संगीताची रचना करण्यासारखं आहे..'' वडिलांच्या प्रभावातला झुल्फी आपली सरंजामदारी विसरुन चक्क मार्क्सच्या प्रेमात पडतो..स्वत:चं सरकार आल्यावर जमीनसुधारणा कार्यक्रम राबवतो आणि बरीचशी जमीन दानही करतो...हे झुल्फिकार भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक..पुरोगामी आणि उदारमतवादी असलेले...

कट टू-
झुल्फिकार भुट्टोंचा मुलगा मूर्तझा..वडिलांप्रमाणेच चे गव्हेरानं भारलेला, माणसाला माणूस समजणारा देश उभारण्याचं स्वप्न पाहणारा...तो शिक्षणासाठी परदेशी असताना देशांतर्गत बंडाळ्यांच्या दरम्यान त्याच्या वडिलांना झुल्फिकार यांना, झिया यांच्या राजवटीत फाशीवर चढवले जाते...त्यांच्या देहाचं दफन होतं..आणि त्यानंतरच झुल्फिकार यांना फाशी दिल्याचं झिया जाहीर करतात...वडिलांच्या हत्येनं मूर्तझा कोलमडतो...इकडे पाकिस्तानात झिया-उल-हक यांची जुलूमी हुकूमशाही टोकाला पोहोचते...कुठलाही मानवी हक्क पायदळी तुडलण्याचं ते बाकी ठेवत नाहीत...रमजानच्या महिन्यात प्रत्येकानं उपवास करावाच म्हणून सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थाच बंद ठेवण्यात येते...त्यामुळे प्रत्येकाला सक्तीचा उपवास घडायचा...शिवाय स्त्रियांसाठी त्यांनी 'हुदूद'कायदा जारी केलेला, ज्याअंतर्गत बलात्कारात बळी पडलेल्या स्त्रीलाच गुन्हेगार मानलं जाई...आणि यासाठी शिक्षा होती दगडांनी ठेचून मारण्याची ...वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मूर्तझा 'अल झुल्फिकार' संघटनेची स्थापना करतो...इकडे सत्ताकांक्षी असणारी बेनझीर सहानुभूतीच्या जोरावर पाकिस्तान कह्यात घेते...तिचा नवरा झरदारी आणि तिला पाकवर एकहाती सत्ता हवी असते..त्यात तिला कोणीच वाटेकरी नको असतो...तिला स्वत:च्या सख्ख्या भावाचीही भीती वाटायला लागते...इतकी की पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतलेल्या भावाला ती पक्षाची उमेदवारीही नाकारते...अर्थात मूर्तझा अपक्ष निवडणूक लढवतो आणि जिंकूनही येतो...

कट टू-
पाकमध्ये भ्रष्टाचारासोबतच हिंसाचारही टोकाला पोहोचतो..बेनझीरच्या आदेशानं 'ऑपरेशन क्लीन अप'मोहीम सुरु होते, ज्याचा सूत्रधार असतो 'तालिबानी ही माझी मुलं आहेत'असं म्हणणारा नसीरुल्लाह बाबर ..1994-95 या दोन वर्षांत तब्बल 2095 लोक मारले जातात...आपल्या विरोधकांना आणि नकोशा लोकांना संपवण्याचा बेनझीरचा हा डाव होता...बीबीसीनं केलेल्या शोधमोहीमेत या लोकांना लोखंडी सळयांचे चटके, ब्लेड आणिचाकूचे वार असा अनन्वित अत्याचार करुन मारल्याचं सिद्ध झालंय...

कट टू-
या सगळ्या प्रकरणाचा कळसाध्याय अर्थातच मूर्तझाची हत्या...70 क्लिफ्टन परिसरातले दिवे मुद्दा्म घालवण्यात आले आणि मूर्तझाच्या ताफ्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला...मूर्तझा तरीही जिवंत होता...त्याला दवाखान्यात घेऊन जातोय असं सांगून कारमध्ये बसवण्यात येतं आणि जबड्याच्या जवळून शेवटची गोळी झा़डण्यात येते..इतकंच नाही तर त्याला उपचारच मिळू नयेत म्हणून ज्या ठिकाणी आयसीयू आणि शस्त्रक्रियेची व्यवस्थाच नाहीए अशा ठिकाणी त्याला 'टाकण्यात' येतं..मूर्तझाच्या ताफ्यातील सहा जणांनाही असंच ठार केलं जातं....त्यानंतर 2009 साली सर्व आरोपी पोलिसांची निर्दोष सुटका होते...हत्या प्रकरणातील एका पोलीस अधिकाऱ्याला तर 'हिलाल-ए-इम्तियाज' हे देशसेवेचं पदक देऊन गौरवण्यात येतं..मूर्तझाची आई नुसरत भ्रमिष्ट होते...आपल्याच पोटच्या दोन मुलांमधली ही जीवघेणी लढाई बघून...बेनझीर आईला जबरदस्तीनं आपल्या घरी घेऊन जाते....

पुस्तकाचं नाव  सार्थ करणारी ही भुट्टोंची रक्तलांच्छित कहाणी...वडिलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या फातिमानं लिहिलेली....पण या गोष्टीत फक्त राजकराणच नाही तर मानवी भाव-भावनांचे अनेक कंगोरे आहेत...आपल्या मुलाला लहानपणी थोबाडीत मारल्यानं पत्रातून त्याची मानपासून माफी मागणारे झुल्फिकार भुट्टो आहेत....मूर्तझाच्या आयुष्यातील तीन स्त्रिया आहेत...त्यात जिच्या आठवणींशिवाय मूर्तझाचा एक क्षणही जायचा नाही अशी ग्रीक डेला आहे, आणि मूर्तझाचा संसार सावरणारी लेबनॉनची घिनवाही आहे...मुलीसोबत मस्ती करणारे, तिला स्वीमिंगपूलमध्ये ढकलणारे 'फाती'चे पप्पा आहेत...बाबांचा हात फ्रॅक्चर झाल्यावर स्वत:चाही हात कापडी पट्टीनं बांधून ठेवणारी वेडी 'फाती' आहे...नवा पक्ष स्थापन करताना पक्षाच्या जाहीरनाम्याची पहिली प्रत मुलीला वाचायला देणारे, 13 व्या वर्षी तिनं सांगितलेल्या स्त्रियांना गर्भपाताचा आणि गर्भनिरोधनाचा हक्क या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश करण्याचं आश्वासन देणारे उदारमतवादी वडील मूर्तझा भुट्टो आहेत.

या पुस्तकानं मला काय दिलं? राजकारण अपरिहार्य असतंच तरीही अदम्य जिज्ञासेनं भरभरुन जगणारी माणसं असतात..दुसरीकडे भारताला आता हुकूमशाहीच हवी, बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी द्या अश्या आततायी मागण्या करणाऱ्या आपल्या काही देशवासियांच्या मागण्या केवळ भावनेच्या भरातून आलेल्या आहेत...कारण ''जाहीर फाशी किंवा चाबकाच्या फटक्यांमुळे न्यायाची पुनर्स्थापना होत नाही, तर उलट सत्तेला मात्र अधिकच बळ मिळतं '' हे महत्त्वाचं तत्त्व सांगणाऱ्या फ्रेंच तत्त्वज्ञ फौकोट यांच्याळशी ओळख करुन दिली...गेल्या चार महिन्यात म्यानमार आणि पाकिस्तानविषयी वाचताना आपण किती भाग्यवान आहोत आणि आपली लोकशाही किती महत्त्वाची आहे हे पुन:पुन्हा जाणवत राहिलं...आणि अश्या आततायी मागण्या करणाऱ्या लोकांना ''बाबांनो, आपल्याकडे काय आहे त्याची किंमत ओळखा आणि ते प्राणपणानं जपा, कारण आपल्याला जे मिळालंय त्यासाठी लोक प्राणांची बाजी लावतायत '' हे एकदा हात जोडून सांगावं असं वाटायला लागलं....

ता.क- फातिमा भुट्टो या मुक्त पत्रकार (फ्री लान्स जर्नालिस्ट) आहेत...'द डेलीबीस्ट', 'न्यू स्टेटसमन'मधून त्यांचं लिखाण प्रसिद्ध होतं.

पुस्तकाचं नाव-
भुट्टो- एक रक्तलांच्छित कहाणी- फातिमा भुट्टो, अनुवाद- चिंतामणी भिडे
प्रकाशक- चिनार पब्लिशर्स, किंमत 400 रु.
(Sarhad Research Centre for Conflict Resolution & Peace)

मूळ इंग्रजी पुस्तक-
Songs of Blood & Sword- Fatima Bhutto, Vintage Books