Friday, June 18, 2010

एका विलक्षण भारी 'बयो'ची गोष्ट.


खूपच दिवसांपासून मला या पुस्तकावर लिहायचं होतं. ही कथा आहे चतुश्रुंगीच्या यात्रेतल्या पाळण्यात दरवर्षी नव्या अप्रूपानं बसणाऱ्या मुलीची, मेंटलमधल्या माणसांचे वाढदिवस जुन्या कागदांतून शोधून आवर्जून साजरी करणाऱ्या ' पेशंट काय फक्त औशधानेच बरा होतो काय?' असं विचारणाऱ्या डॉक्टरची, ही कथा आहे 'मुक्तांगण' मध्ये हेरखातं ठेवून ब्राऊन शुगरच्या पुड्या बरोबर पकडणार्या 'चतुर' व्यवस्थापकाची, स्वतःच्या पर्समध्ये नेलकटर ठेवून दिसेल त्या मुलांची नखं काढणाऱ्या डॉक्टरीण बाईची, कॅन्सर झालेला असूनही सतत उत्साहानं कामात राहणाऱ्या बाईची, केमोथेरपी चालू असताना त्या खोलीत सरोदची कॅसेट आणि ताजी फुले ठेवणाऱ्या नवर्याची, मुलींसाठी कपडे शिवणार्या आणि वाढदिवसाला आवर्जून पत्र लिहिणाऱ्या 'वेड्या' पण शिस्तशीर आईची. पुस्तकाचं नाव आहे - सुनंदाला आठवताना .


ही सुनंदा म्हणजे डॉ. सुनंदा अनिल अवचट.म्हणजे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य वापरायचं तर ही 'डोंगराएवढी' बाई उभी होती म्हणूनच अनिल अवचट मोठे होऊ शकले. अवचटांच्या 'स्वतःविषयी ' या पुस्तकात सुनंदाविषयी एक वेगळं प्रकरणच आहे, तेही वाचण्यासारखं आहे. हे पुस्तक सुनंदाच्या मृत्युनंतर १० वर्षांनी छापलं गेलं. व्यसनमुक्तीसाठी काम करणारी पुण्याची 'मुक्तांगण' संस्था डॉ. सुनंदा अवचट यांनीच उभारली, ते ही संस्थेच्या कामाचा कसलाच पूर्वानुभव नसताना! सामाजिक काम केल्याचा कसलाही आव न आणता स्वतःची नोकरी अगदी व्यवस्थित सांभाळून या बाईनी खूप काम केलंय.


या पुस्तकात पाच लेख आहेत. त्यातला 'सुनंदाला आठवताना' हा अनिल अवचट यांचा सह्जीवनावरचा आणि यशोदा वाकणकरचा 'आई, मी आणि पत्रं ' नावाचा हे २ लेख अप्रतिम आहेत. पहिल्या लेखात अनिल- सुनंदा या दांपत्याची सुरुवातीच्या काळातली भांडणं, भांडण्याचा अभ्यास करून कारण शोधण्याची पद्धत, एकमेकांसोबत वाढणं, एकमेकांचे वाढदिवस सिंहगडावर साजरे करणं, प्रत्येकाचा एकेक दोष मिटवण्याची भेट देणं, नकला करणं, तासभर चालणारी जेवणं यासोबतच नंतरच्या टप्प्यात सुनंदाला कॅन्सर आहे हे कळल्यावर कोलमडून न जाता अधिक उत्साहानं आणि रसिकतेनं जीवन जगणं., खरोखर वाचण्यासारखच आहे. रोज रात्री गोळ्या खाण्यासाठी 'आ ' करून तयार होणारी , 'या गोळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, मी नक्की बरी होणार आहे, कारण मला खूप काम करायचंय' असं म्हणणारी, केमोथेरपीनं डोक्यावरचे सगळे केस गेल्यावर खोटा विग नाकारणारी ,' करायचाय काय तो विग ? मला तू अन तुला मी आहे बस कि मग !' असं 'positive ' जगणं जगणारी सुनंदा बघून मी थक्क झाले. ''सुनंदा गेल्यावर माझा सिंहगड संपलाच, एकदा मुद्दाम प्रभू कुटुंबाला घेऊन सिंहगड फिरलो, सगळ्या जागा पहिल्या पण त्यात 'सुनंदापण' नव्हतं,'' असं बाबा म्हणतात.


शेवटचा यशोदाचा लेखही फार छान आहे, आईनं मुलीला प्रत्येक वाढदिवसाला दिलेली पत्रं त्यात आहेत.मला त्याबद्दल फार बोलता येणार नाही ,पण एक अगदी आतलं -आतलं नातं बघायला मिळतं. सुनंदानी लिहिलेलं एक पत्रच थोडक्यात उद्धृत करते.


''MY YASHO ,
MY NEAREST , MY DEAREST , MY INNOCENCE , MY JOY , MY SWEET SONG , MY FRIENDLY FRIEND , MY DELICATE DANCER , MY SUPPORT , MY CARE TAKER , MY LIFE , MY ONLY CONFIDENCE , MY CONFIDENCE IN CONFIDENCE .
-YOURS ,
आई.''


हे पुस्तक फक्त 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, आळंदी रोड, पुणे' इथंच मिळतं.खरं तर डॉ. सुनंदा अवचट या विषयावर एक आणखी वेगळं, स्वतंत्र पुस्तकच होऊ शकतं, असं वाटतंय. दर्जाच्या मानानं किंमत फारच कमी ठेवलीय - ५० रु.