Sunday, July 8, 2012

सबिना आणि 'जिलबी'पुराण


तुम्हांला जिलबी खायला आवडते? किंवा तुम्हांला वेगवेगळ्या रेस्टॉरंटसमध्ये जाऊन खादाडी करायला आवडते का? किंवा तुम्हांला इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे का ? या पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थी असेल तर तुम्हांला सबिना सेहगल –सैकिया यांच्याविषयी जाणून घ्यायलाच हवं......सबिना सेहगल या भारतातल्या अग्रगण्य आणि सर्वोत्तम फूड क्रिटीक मानल्या जातात.....सबिना 20 वर्षं टाईम्स समूहामध्ये होत्या.....’दिल्ली टाइम्स’ आणि ‘संडे टाइम्स’चं संपादकपदही त्यांनी भूषवलं...’TOI Good Eating Guide’  या पुस्ताकच्या त्या लेखिका..पदार्थांविषयी आणि रेस्तरांविषयी वृत्तपत्रातून परीक्षणे लिहिणे ही पद्धत भारतात सबिना यांनीच चालू केल्याचं मानले जातं......इतकंच नाही तर ‘पेज थ्री जर्नालिझम’ हा बरावाईट प्रकारही सबिनांनीच सुरु केला....’दिल्ली टाइम्स’ च्या त्या संपादक झाल्यावर पानं कशी भरायची आणि खप कसा वाढवायचा असा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर होता......मुंबईत चटपट्या, मसालेदार बातम्यांसाठी बॉलिवूड आहे...पण दिल्लीत अश्या बातम्या कुठून आणायच्या या प्रश्नाचं उत्तर सबिना यांनी शोधून काढलं....दिल्लीतल्या उद्योगपती आणि नेत्यांच्या घरच्या पार्ट्यांचा मसालेदार वृत्तांत त्यांनी वृत्तपत्रामध्ये छापायला सुरुवात केली आणि जन्म झाला- ‘पेज थ्री’चा!! ’मेन कोर्स’ नावाचं सबिनांचं सदर अतिशय प्रसिद्ध होतं....ज्यातून त्या रेस्तरॉंचं परीक्षण करायच्या....त्यांच्या कौतुकाचे शब्द आपल्या वाट्यास यावेत यासाठी उत्तमोत्तम रेस्तरा धडपडायचे...त्या आपल्या लिखाणाबाबत अतिशय काटेकोर होत्या ...जर एखादं रेस्टॉरंट आवडलं नाही तर त्या कठोर शब्दात त्याच्यावर ताशेरे ओढायच्या...आणि या उलट जर एखादं रेस्तरा किंवा धाबा जरी चांगला असेल तर त्याची तारिफ करताना त्या थकायच्या नाहीत....त्या शेफचं आणि रेस्तराच्या अॅम्बियन्सचं हातचं न राखता कौतुक करायच्या......सबिना म्हणत ‘’ माझा वाचक माझ्या शब्दावर विसंबून पैसे खर्च करतो त्याचा विश्वासघात मी करणार नाही, दर्जा सांभाळणं हे माझं कर्तव्यच आहे‘’
सबिनांचा खाद्यपदार्थांबाबत अतिशय दांडगा अभ्यास होता..त्यातील काही नमुनादाखल किस्से -
‘’आपल्या सर्वांच्या लाडक्या आईस्क्रीम कोनचा जन्म कसा झाला याची अतिशय इंटरेस्टिंग कथाही सबिनांनीच सांगितली आहे....जिलेबी हा पदार्थ मूळचा इराकमधल्या सिरियाचा...त्याचं मूळ नाव ‘Zalabia’ ..अमेरिकेतल्या सेंट लुई प्रांतात एका औद्योगिक प्रदर्शनात सिरियाचा अर्नेस्ट हाम्वी झलाबिया करुन विकत होता......झलाबिया म्हणजे मैद्याच्या आंबवलेल्या पिठात अंडी आणि मध घालून केलेली कुरकुरीत जाळीदार बिस्कीटं....हाम्वीचे झलाबिया फारसे विकले जात नव्हते...उन्हाळा असल्याने त्याच्या शेजाऱ्याच्या स्टॉलवरचं आईस्क्रीम मात्र तुफान विकलं जात होतं......अचानक हाम्वीच्या लक्षात आलं की आपला स्टॉलधारक शेजारी थोडा संकटात आहे.....झालं असं की त्याच्याजवळच्या आईस्क्रीमच्या ताटल्याच संपल्या, ग्राहकांची मागणी मात्र वाढतच होते...आणि मग हाम्वीने शेजाऱ्याला मदत करण्यासाठी शक्कल लढवली....त्यानं आपल्या झलाबिया भाजण्याआधी त्यांना शंकूंचा आकार दिला.....आणि जन्म झाला आईस्क्रीमच्या कोनाचा...!!! या झलाबियाचा महाराष्ट्रीय अवतार म्हणजे, जिलेबी...समर्थ रामदास स्वामींचे शिष्य रघुनाथ नवहस्त यांच्या 17 व्या शतकातील ‘भोजनकुतूहुल’ या ग्रंथात जलवल्लिकेचा आणि कुण्डलिकेचा (संस्कृत नाव) म्हणजेच जिलबीचा उल्लेख येतो.....त्याहीअगोदर 15 व्या शतकात जिनासुराच्या कथेत जिलबीचा उल्लेख आढळतो....त्यामुळे जिलेबी ही महाराष्ट्रातूनच भारतभर गेली असं मानण्यात येतं....मूळच्या झलाबियात बदल होत गेला....मध , अंडी वगळून साखरेचा पाक आला, भाजण्याच्या ऐवजी तळण्याची शक्कल वापरली आणि तयार झाली – आपली जिलेबी.
खाद्यपदार्थांच्या इतिहासाची असंख्य पुस्तकं जगभरात आहेत.....त्यापैकी खाद्यपदार्थांचं बायबल मानलं जावं असं पुस्तक म्हणजे – अरबी भाषेतलं ‘अल-किताब-अल-तबिख’.. अल वराकच्या या पुस्तकात 132 प्रकरणं आहेत....गद्य-पद्य अश्या वेगेवगळ्या प्रारुपात पदार्थांची माहिती आहे.....खाण्यापिण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या इराकच्या अब्बासिद घराण्यानं हे पुस्तक लिहवून घेतलं...अब्बासिदांची सत्ता हा इस्लामी सत्तेचा सुवर्णकाळ मानण्यात येतो.....कागदनिर्मिती यांच्याच काळात झाली, अरेबियन नाईटस आणि लैला –मजनूच्या कथाही अब्बासिदांच्या कारकिर्दीतल्या......बीजगणित म्हणजेच अलजेब्रावरचं जगातलं पहिलं पुस्तरही यांच्याच कारकिर्दीतलं...’झलाबिया’चा पहिला उल्लेखही या अल- किताब मधलाच....हे घराणंच खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध...हारुन अल रशीद हा सर्वात कर्तुत्त्ववान खलिफा...यांच्या कुळातील सर्व पुरुषांना स्वत: स्वयंपाक करता येई.(कारण भाउबंदकीमुळे कधीही वाळवंटातून पळून जावं लागलं तर जीव वाचवता यावा हा उद्देश!) हारुनच्या कारकिर्दीत गावागावातून पाककृतीच्या स्पर्धा व्हायच्या....दरबारातही सतत प्रयोग होत असायचे....या प्रयोगातूनच जन्मलं आपलं वांग्याचं भरीत.....झालं असं की हारुनच्या एका मुलाला वांगी भयंकर आवडायची, एके दिवशी त्याने वांगी भाजून नवीनच पदार्थ तयार केला आणि त्याला नाव दिलं ‘बुर्रान’ या आपल्या लाडक्या पत्नीचं....पदार्थाचं नाव पडलं ‘बुर्रानियत’....ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन शब्द बनला ‘भरीत’.....’’

सबिनांनी सांगितलेले असे कितीतरी किस्से...सबिनांचं जितकं प्रेम खाण्यावर होतं तितकंच प्रेम गाण्यावरही होतं....सबिना अतिशय लिबरल होत्या.... देश- धर्म-भाषाचं बंधन तोडण्याची ताकद खाण्यात आणि संगीतात आहे असं त्या मानत....कायम माणुसकीचा पुरस्कार करणाऱ्या सबिनांना दुर्देवानं मरण मात्र आलं ते २६/११ च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात......मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये त्या आलेल्या होत्या......ताज व्यवस्थापनानं त्यांना आमंत्रित केलं होतं.....Travel & Living च्या कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट शेफची निवड करण्यासाठी त्या खास आमंत्रित होत्या...आणि दुर्देवाने ताजवर अतिरेक्यांचा हल्ला झाला.....आणि सबिना सेहगल – भारतीय खाद्यसंस्कृतीचा इतिहास घेऊन कायमच्या आपल्यातून निघून गेल्य़ा....(असं म्हणतात की त्याचवेळी सबिना या अतिरेकी असल्याचा जावईशोधही पत्रकारांनी लावला...हातात बूम असणाऱ्यांनी तिच्यावर वाट्टेल ते आरोप केले....आणि आपल्या देशात ‘सबिना’ हे नाव असणं किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं)

विशेष सूचना – ही सर्व माहिती मी जमवलेली नाही....’माहेर’ या मासिकात जानेवारी पासून खाद्यपरंपरांवरचं एक विशेष सदर सुरु झालंय....चिन्मय दामले नावाचा एक बापमाणूस, अतिशय सुंदर लेखमाला चालवतोय....त्यातल्याच एका लेखाचा हा सारांश...जिज्ञासूंनी, रसिकांनी सदर मुळातून वाचावं...मला शेअर केल्याशिवाय अजिबात राहावलं नाही....एक चांगला लेख वाचल्यावर जो आनंद होतो, तसा पुरेपुर आनंद मला दामलेंचं लेख देतायत...

Friday, September 23, 2011

मी पाहिलेली छटाक मुंबई..

मी पाहिलेली छटाक मुंबई
मोठ्या मनाच्या थोड्याच माणसांची,
प्रचंड प्रॅक्टिकल आणि उतू जाणाऱ्या श्रीमंतीची,
लिटरली गगनचुंबी टॉवर्सची आणि क्लासिक आर्किटेक्चरल इमारतींची,
चाळींची, वन रुम किचनमधल्या दिमाखदारपणाची आणि
फुटपाथवर झोपणाऱ्या ,एक घोंगडं-ताट-तांब्या एवढाच संसार असणाऱ्या म्हातार आजीचीही,
9.53 वगैरे मला कधीच न पकडता येणाऱ्या लोकल्सची,
मुंबईत चहा चक्क पार्सल मिळतो आणि शहाळंही...!!
लोक समोसा-पाव, भजी-पाव खातात
सरदारच्या पावभाजीसाठी, प्रकाशच्या वड्यासाठी आणि भरतक्षेत्रमधल्या साड्यांसाठी चक्क रांगा लावतात.
मुंबईत गोष्ट सुंदर, भारी, ग्रेट नसते तर ती 'सेक्सी' असते..
मुंबई कष्टकऱ्यांची-
रेल्वे लाईनच्या मध्ये राखलेल्या छोट्या तुकड्यांवर चक्क भाज्या पिकवणाऱ्यांची,
रानभेंडी, रेन ट्री, पेल्टाफोरम आणि मध्येच वाकलेल्या केळींचीही....
मुंबई घाणेरड्या हवामानाची, तिखटा-हळदीला बुरशी लागण्याची,
धाडकन अचानक कोसळणाऱ्या पावसाची
मग हापिसात थ्री-फोर्थ पँटी घालण्याच्या फॅशनीची
आणि त्या पावसातल्या वाफाळणाऱ्या मॅगीची
कायम शेवाळलेल्या भिंतींची..
आणि मला आवडणाऱ्या व्हायब्रंट कलर्सनी रंगवलेल्या
'हम पंछी इक तार के' वगैरे लिहिलेल्या क्रिएटिव्ह भिंतींचीही !
(बहुधा लोकांनी लघवी करु नये म्हणून...)

मुंबईचे सगळे आमदार, नगरसेवक 'कार्यसम्राट' असतात,
म्हणूनच कचराकुंड्या भरभरुन वाहतात, गटारी तुंबतात, माणसं मरतात
मुंबईतली माणसं कायम पैश्यांविषयी बोलतात
आणि सोनचाफ्याची फुलं घेताना मात्र भाव करतात...

मुंबई प्रचंड व्हरायटीची, सोयी सुविधांच्या सुकाळाची
साध्या मिरच्यासुद्धा सहा-सात प्रकारच्या मिळण्याची,
माझ्यासाठी मुंबई म्हणजे,
प्रवासाचं कधीच न वाटणारं 'डेस्टिनेशन'
कामाच्या ठिकाणी सुमारांची सद्दी,
अर्ध्या हळकुंडानं जेजुरी झालेल्या माणसांची गर्दी,
च्यायला 'क' च्या बाराखडीनं माझ्या डोक्याची होणारी मंडई,
शीण घालवणारा लाडका समुद्र,
कोपऱ्यावरचा चाफा पाहून कुणाची तरी आठवण येणं.......
कधीच वेळेवर न होणारं जेवण,
ड्यूटी संपवून भाग भाग डी के बोस करत गाठावी लागणारी लायब्ररी,
अंगणात गेल्यासारखी दर आठवड्याची दादरची फेरी,
फुटाणे खाउन लाडावलेली कबुतरं आणि कर्कश्श कावळे,
मुंबई विझलेल्या गिरण्यांच्या चिमण्यांची,

मुंबई म्हणजे भर समुद्रात उभी करुन ठेवलेली वरळी - वांद्रे सी लिंक ची सतार,
मुंबई भिकबाळी घातलेल्या गणपती बाप्पाची,
देवनारच्या TISS मधल्या दृष्ट लागण्याजोग्या शांततेची,
मुंबई जिथं बसमधल्या लेडिज सीटवर पुरुष कधीच बसत नाहीत...
मुंबई ट्रेनमध्ये भजनं म्हणणाऱ्या, गणपती बसवणाऱ्या , गटारी साजरी करणाऱ्या उत्साही जनतेची,
मुंबई साईबाबांच्या भक्तांची,
मुंबई घरं नसलेल्या कित्येकांची,
वाहणाऱ्या कचराकुंडीत उभारुन पाव शोधणाऱ्या पोराची,
रक्ताळलेल्या माथ्याचं पोर घेउन स्टेशन-स्टेशनवर भीक मागणाऱ्या आईची
ताई, घरची आठवण येतीय म्हणून भर ट्रेनमध्ये माझ्यासमोर रडणाऱ्या बांगड्या विकणाऱ्या -बोटभर चिंधीची
आणि काहीच न करु शकणाऱ्या हताश माझीही.......







Monday, March 14, 2011

Love each other or perish - W.H.Auden.

''जो पर्यंत आपण इतरांवर प्रेम करत असतो आणि ती प्रेमभावना आपल्या मनात ताजी असते, तोपर्यंत आपण मेलो तरीही त्यांच्या पासून दूर जाऊ शकत नाही. आपण निर्माण केलेलं प्रेम त्यांच्या सोबत राहतंच . आपल्या आठवणी राहतात. आपण जगताना ज्यांना -ज्यांना प्रेमळ स्पर्श केला, पोषण केलं, शिकवलं, त्या प्रत्येकाच्या हृद्यात आपलं अस्तित्त्व असतं.''
- from Tuesdays with Morrie - Mitch Albom
यानंतर मी फक्त 'आमेन' म्हणू इच्छिते.

Friday, February 25, 2011

आजीजवळ जाऊन सगळी बडबड आणि तणतण मी केली,
माझं बोलणं ऐकून, माझे डोळे पुसून, पाठीवर हात फिरवत
आज्जी फक्त एवढंच म्हणाली,
''पोरी, आयुष्य असंच असतं''
समजूत पटल्यासारखी शांत होऊन मी खोलीच्या बाहेर पडले
तर ती हमसून -हमसून रडू लागली....
तेव्हा मी ही इतकंच म्हणाले,
''आज्जी, तू तरी कुठं सरावलीएस अजून आयुष्याला ?''

Sunday, November 14, 2010

तुम्हांला नाहीच जमायचं.....!

परवा दिवशी पिठल्यासाठी डाळीचं पीठ कालवायला घेतलं. अचानक आवाज आला, ''...तुम्हांला नाहीच जमायचं!'' मला काही कळेचना आवाज कुठुन येतोय ते ! कारण रुममध्ये मी एकटीच होते.च्यायला, आता आपल्याला एकटं असताना भास पण व्हायला लागले की काय, असा विचार करत असतानाच, पुन्हा आवाज आला '' खरंचय नाहीच जमायचं तुम्हांला...!'' पुन्हा आवाज..नीट पाहिलं तर आवाज येत होता डाळीचं पीठ कालवत असलेल्या भांड्यातूनच... !
'' कळलं का नाहीच जमायचं तुम्हांला, माझ्यासारखं सगळ्यात मिसळून जायला..कधी कधी तरीही स्वतःच अस्तित्त्व वेगळं ठेवायला..'' '' म्हणजे?'' '' मी किती वेगवेगळ्या पदार्थात सहज मिसळून जातो ,कित्ती वेळेला माझी गरज पडते तुम्हांला ! आत्ताचंच बघ...भाजीचा पटकन होणारा उत्तम पर्याय म्हणून वापरता ना ब-याचदा मला तुम्ही ?म्हणजे हा रोजचा पदार्थ झाला,पण अगदी खास म्हणवल्या जाणा-या पदार्थातही असतो मी..ढोकळा, मोहनथाळ, बेसनाचा लाडू, सुरळीच्या वड्या, म्हैसूरपाक हे पदार्थ माझ्यामुळेच ओळखले जातात. पण तरीही ब-याच भाज्यांमध्ये साईड आर्टिस्टचं कामही करतोच की मी – मेथीची, पातीची डाळीचं पीठ पेरुन केलेली भाजी, कढी किती नावं सांगू? शिवाय शेव, भजी,फरसाण या चमचमीत पदार्थांची माझ्याशिवाय कल्पना तरी करु शकता का तुम्ही ?’’
बेसन की बात सोचनेवाली थी....!!

Saturday, October 2, 2010

Why 'GANDHIJI' ?


माझ्यासाठी,
१) मानवाच्या वैचारिक आणि माणुसकीच्या उत्क्रांतीतल एक खूप महत्वाचं आणि उन्नत शिखर!
२) जगातला सर्वश्रेष्ठ नेता, ज्यानं रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांना जिंकता येतं, हे दाखवून दिलं.
३)त्यांनी 'सत्य' सर्वश्रेष्ठ मानलं.
४) म्हणजेच चुका करत माणूस म्हणून जगण्याची मुभा आहेच, पण त्यातच समाधान न मानता, धीटपणे आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करण्याचा देवत्वाचा मार्गही दाखवला.
५) पैसा आणि संसाधनांनीच (resources) यश आणि समृद्धी आणता येते, हे त्यांनी खोडून दाखवलं.
६) आणि आपल्याला लक्षात ठेवायला सांगितलं,
''वैष्णव जन तो तेणे कहिए जो,
पीड़ पराई जाणे रे!!''

Thursday, August 19, 2010

उतनी दूर मत ब्याहना ...बाबा |

खरंतर हा find आईचा. तिला आणि मला खूप आवडलेली ही कविता.'निर्मला पुतुल' नावाच्या हिंदी कवियित्रीची. संथाळी आदिवासी जमातीत जन्मलेल्या त्या! 'नगारे कि तरह बजते हैं शब्द !' हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह. त्यांच्या काही कवितांचा अनुवाद सध्या कविता महाजन करत आहेत.
बाबा,
मुझे उतनी दूर मत ब्याहना,
जहाँ मुझे मिल जाने खातिर,
घर की बकरियां बेचनी पड़े तुम्हें
जंगल नहीं,पहाड़ नहीं जहाँ,
वहाँ मत कर जाना मेरा लगन
वहाँ तो कतई नहीं,
जहाँ की सडकोंपर
मन से भी ज्यादा तेज दौडती हो मोटरगाड़ियाँ

उस घर में मत जोड़ना मेरा रिश्ता,
जहाँ बड़ा सा खुला आँगन ना हो,
मुर्गे की बांग पर होती नहीं हो जहाँ सुबह
और शाम पिछवाड़े से जहाँ
पहाडीपर डूबता सूरज ना दिखे
मत चुनना ऐसा वर,
जो पोचई और हड्डियों में डूबा रहता हो अक्सर,
काहिल-निकम्मा हो,
माहिर हो मेले से लड़कियां उड़ा ले जाने में,
ऐसा वर मत चुनना मेरी खातिर
कोई थारी-लोटा तो नहीं
कि बाद में जब चाहे बदल लुंगी
अच्छा -ख़राब होने पर!

जो बैंत बात में बात करे लाठी डंडा की,
निकले तीर-धनुष, कुल्हाड़ी
जब चाहे चला जाए बंगाल,असम या कश्मीर
ऐसा वर नहीं चाहिए हमें
और उसके हाथों में मत देना मेरा हाथ,
जिसके हाथोंने कभी कोई पेड़ नहीं लगाए,
फ़सले नहीं उगाई जिन हाथोंने,
जिन हाथों ने नहीं दिया कभी किसी का साथ
किसी का बोज़ नहीं उठाया

ब्याहना हो तो वहाँ ब्याहना,
जहाँ सुबह जाकर शाम तक लौट सको पैदल ,
मैं जो कभी रोंऊ इस घाट
तो उस घाट नदी में स्नान करते तुम
सुनकर आ सको, मेरा करुण विलाप
चुनना ऐसा वर,
जो बजाता हो बाँसुरी सुरीली
और ढोल-मांदल बजने में हो पारंगत
बसंत के दिनों में ला सके जो रोज
मेरे जुड़े की खातिर पलाश के फूल ,
जिससे खाया न जाए
मेरे भूखे रहनेपर......
उसीसे ब्याहना मुझे !