आज ४ जून २०२४.
यंदाची लोकसभा निवडणूक आणि त्याचे लागलेले निकाल सर्वार्थाने महत्त्वाचे आणि 'लोकशाही' आणि लोकांची ताकद काय असते हे खरोखर दाखवून देणारे आहेत. एका दिवसांत राजाचा रंक करायची ताकद असते, तुमच्या- आमच्या मतात. महाराष्ट्र दिल्लीच्या मोदी-शाही समोर झुकला नाही, आपला कणा ताठ करून उभा राहिला आणि आपलं स्वतंत्र अस्तित्त्व टिकवले याचा अभिमान आहे.
या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी गलिच्छ आणि विकृत विधानांची परिसीमा गाठली. काँग्रेस सत्तेवर आलं तर तुमची मंगळसूत्रं सुद्धा सोडणार नाही, तुमची वडिलोपार्जित संपत्ती सुद्धा काँग्रेस जास्त मुलं असलेल्यांना- (अर्थात मुस्लिमांना) वाटून टाकेल, एससी एसटींना भीती दाखवली की तुमचे आरक्षण काढून मुस्लिमांना दिले जाईल, शेवटी शेवटी तर इतके घायकुतीला आले शेठ, की तुमच्या दोन म्हशींपैकी "एक भैंस ये इंडि आघाडी वाले ले जाएंगे!!" असं म्हणाले. ते कधीही 'इंडिया' आघाडी म्हणत नव्हते, हे लक्षात आलं का तुमच्या? सातत्याने हिंदू- मुस्लिम द्वेषाची ठिणगी पेटती ठेवणं, मुस्लिमांना सतत खलनायक ठरवणं, राम मंदिर आणि फक्त हिंदू हिताच्याच गोष्टी करणं- हे सगळं आपल्या भारतीयत्वाला लाज आणणारं होतं. हा देश विविधतेसाठी ओळखला जातो आणि सौहार्दासाठीही. मोदीजी तुम्ही त्यालाच नख लावायला निघालात!! एकीकडे हिंदूहित, गोमाता म्हणायचं आणि दुसरीकडे बीफ एक्सपोर्ट कऱणाऱ्या कंपन्यांकडून इलेक्टोरल बाँडसच्या माध्यमातून पैसा स्वीकारायचा, हा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील किमान काही जणांना तरी कळलं याचा आनंद आहे. महाराष्ट्राइतकाच उत्तर प्रदेशच्या जनतेने हा भावनिक ब्लॅकमेलिंगचा आणि त्याच त्याच धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव उधळून लावला आणि मोदींचा अश्वमेध वगैरे करायला निघालेला घोडा चांगलाच रोखला याचा मनापासून आनंद आहे. इतकं की खुद्द अयोध्येत भाजपचा उमेदवार पराभूत झालाय.
महाराष्ट्रात तर तुम्ही आमदारच नव्हे चक्क पक्ष चोरलेत, ते ही दिवसा ढवळ्या, ते ही फार साव असल्याचा आव आणून!! शिवाय जुने पक्षच नकली आहेत, म्हाताऱ्याला काय कळतंय, शेतकऱ्यांना काय कळतंय, राममंदिराचं गाजर पुरेसं आहे की- मुस्लिम लागतातच कशाला? सगळे दलित रामदास आठवलेंसारखे वेडे असतात वगैरे समजलात की काय मोदीजी तुम्ही? आपलं धनुष्यबाण आणि घड्याळ हे चिन्ह पक्षाचं नाव काहीच नसताना, नवी मशाल आणि तुतारी ही चिन्हं घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जो महाराष्ट्र पिंजून काढला त्याला तोड नाही. हे सोप्पं नव्हतं आपलं नवं चिन्ह लोकांच्या लक्षात राहावं, यासाठी झटणं, धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्यांविरोधात 'हृद्यात राम आणि हाताला काम' असा प्रचार करणं, इडी, धमक्या, पैशाची प्रलोभनं यांना बळी न पडता आपल्या बाजूने मतदान वळवून घेणं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आत्मविश्वास आणि विशेषत: आदित्यचं वक्तृव या सगळ्या कठीण प्रसंगात चांगलंच सुधारलं. शरद पवार तर जुने मुरलेले गडी आहेत- महाराष्ट्राची नस माहित असलेले. काँग्रेसनेही जीव ओतून प्रचार केला, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, भारत न्याय यात्रा- गेम चेंजर ठरली. काँग्रेसने पक्षाची पळवापळवी होऊ दिली नाही. प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्या सभांनी जान आणली, सोलापूरच्या प्रणिती शिंदेंसारख्या उमेदवारांनी काहीही गृहीत न करता काय लेव्हलवर प्रचार केलाय, तो मी स्वत: पाहिलाय या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन.
याशिवाय महाराष्ट्रातल्या महाआघाडीच्या विजयाचं मोठ्ठं श्रेय द्यावं लागेल- निर्भय बनो चळवळीला. Vishwambhar Choudhari विश्वंभर चौधरी, असीम सरोदे Asim Sarode निखिल वागळे Nikhil Wagle सर Utpal VB यांनी पुरोगामी भूमिका कायमच घेतलीये, पण या अटीतटीच्या निवडणुकीत शुद्ध राजकीय भूमिका घेण्याचं धाडस दाखवलं, जीवावरची रिस्क घेऊन! आणि कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गाव- वस्ती पातळीवर महाराष्ट्रात शक्य त्या ठिकाणी मोदी- शहांचे मातीचे पाय आणि धूर्त वृत्ती, आणि संविधान वाचवण्याची निकड दाखवून दिली. याशिवाय रवीशकुमार, प्रशांत कदम, ध्रुव राठी, द रॅन्टिंग गोला, मुक्ता कदम आणि न जाणो कितीतरी ज्ञात अज्ञात यू ट्यूबर्स, इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सने भाजप आणि एनडीएचा राक्षसी चेहरा फॅक्टसहित सतत समोर आणला आणि भाजप ज्या नवमतदारांना सातत्याने लक्ष्य करत असतं, त्यातल्या विचारी तरूणांना भाजप- एनडीएचा हा स्वकेंद्री पोकळ गेम कळला.
एकूणच विशेषत: महाराष्ट्राच्या आजच्या निकालावर मी अत्यंत खुश आहे, मात्र महाविकास आघाडीला लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी खरोखर लोकहिताची कामं पुढे येत करत राहावी लागतील आणि विधानसभा निवडणुकीला अजिबात गाफील राहून चालणार नाही. त्यांच्यासमोरची आव्हानं फारच मोठ्ठी असणार आहेत. सर्वांना शुभेच्छा आणि आपलं पुरोगामीपण आणि खराखुरा विकास होवो या सदिच्छा. महाराष्ट्रांची जनता या लफंग्यांना आणि विष पेरणाऱ्यांना भुलली नाही याचा मन:पूर्वक आनंद आणि अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर
#LokSabhaElection2024
#LokSabhaResult
#MaharashtraPolitics
#NoToHatePolitics
#NoToHateSpeech
#notobjp
#माजकरायचानाय
#ShivsenaUBT
#SharadPawar
#Congress
#sanvidhan
#महाविकासआघाडी
#निर्भयबनो