Saturday, March 16, 2013

गंधवेड..

मला ज्ञानेंद्रियं ही फक्त ज्ञानेंद्रियं वाटतच नाहीत,
कधीच,
मला ती रसनेंद्रियं वाटतात...
आयुष्यावर प्रेम करायला भाग पाडणारी...
तर त्यात आपली सर्वाधिक गट्टी आहे ती 'घ्राणेंद्रिया'शी म्हणजेच नाकाशी...
मी गंधांवर जाम फिदा आहे,
नाक उंचावून मनापासून खोलवर तो गंध साठवायला आतुरणारी...
ते प्रत्येक वेळी 'सो कॉल्ड' सुगंध नसतात,
वासच असतात साधेसे,
पण ते अनुभवल्यावर काय वाटतं ते शब्दात नाही मांडता येत....

जसं की गंध आमच्या सोलापूरच्या 'हुतात्मा स्मृती मंदिर'चा तो गंध आणि 'हुतात्मा' हे समीकरण डोक्यात इतकं पक्कं आहे की तो वास नाही आला तर मी 'हुतात्मा'मध्ये आलीय असं वाटतच नाही....

दुसरा वास धुराचा म्हणजे 'I am crazy for Smoke.' असं म्हटलं तरी चालेल इतका आवडतो धूर...
लाकडं, पालापाचोळा, कागद, फटाके पेटवल्यावर येणारा, चुलीतून येणारा धूर अगदी सगळं-सगळं-
equal to heaven.(Please note- सिगरेटचा धूर आवडत नाही)

तिसरा अतिप्रिय गंध अर्थातच सोनचाफ्याचा- हे दैवी फूल आहे आणि मी त्याच्या गळ्यापर्यंत प्रेमात आहे.
चौथा वास मृदगंधाचा- उन्हानं रापलेल्या कोरड्याठाक भुईवर जेव्हा पावसाचा थेंब पडतो, किंवा आपण सडा टाकतो तेव्हा जमिनीच्या पोटातनं जो तृप्तीचा हुंकार येतो...तो मृदगंध कुणाला आवडत नसेल?

पाचवा वास आमच्या ऑफिसजवळच्या उदबत्तीच्या दुकानाचा....रोज घरी परतताना मुद्दाम फुटपाथवर चढून,अस्मादिक त्या दुकानासमोरुन हळू-हळू चालत तो वास साठवून घेतात... :D

सहावा वास - शिकेकाईचा, विकतची नव्हे, घरी तयार केलेली दळलेली , जाडसर- शिकेकाई, उटणं, फक्त दिवाळीतच ज्यांचा वास आवडतो ते सुगंधी तेल, मोती, म्हैसूर सँडल साबण, बाकी जगातल्या कुठल्याही सेंट-डिओचे वास आवडत नसले तरी बाबा वापरतात ते सेंट- त्याचा वास आपल्या आवडीचाच...

डांबर गोळ्या आठवतात कुणाला? आपल्याला लै आवडतो त्याचा वास...रॉकेल, फिनेल, पेट्रोलचा वासही आवडता...

वास जुन्या कपड्यांचा, वास आजीची आठवण करुन देणाऱ्या जुन्या गोधडीचा, जुन्या पुस्तकांचा, नव्या-कोऱ्या वह्या-पुस्तकांचाही, सिंथॉलचा वास आणि बार्शीचं माझ्या अप्पा मामाचं घर हे समीकरणही डोक्यात पक्कं...वास कापुराचा, वास वाळ्याचा , कुलर नुकताच सुरु केल्यानंतर येणारा विशिष्ट वास...वास मोगऱ्याच्या गजऱ्याचा , वास मोगऱ्याचं फूल माठात टाकलेल्या पाण्याचा.....

स्वयंपाकाशी निगडित वासांची किती वर्णनं करावीत- गॅसवरच्या भाकरीचा वेगळा, पोळीचा वेगळा, चुलीवरच्या खरपूस भाकरीचा, थालिपीठाचा वेगळा,मसालेदार वांग्याच्या भाजीचा, वास तेलात आत्महत्या करणाऱ्या आलं-लसूण-कोथिंबीर-कडिपत्त्याचा, ताज्या दळलेल्या कॉफी बीन्सचा, पाकिट फोडून नुकत्याच बाहेर काढलेल्या चहापावडरचा, इंद्रायणी भाताचा, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा,गरम भाजलेल्या कणसाचा,  ताज्या पुदिना- लिंबाचा, कढवलेल्या खमंग तुपाचा, आईनं तुपावर भाजलेल्या बडिशेपेचा, खमंग बेसनाच्या लाडूचा, आमच्या सोलापुरातील 'अय्यंगार बेकरी' च्या गरमा-गरम ताज्या खारीचा...(बऱ्याचदा मी कॉर्नरवर गाडी थांबवून तो वास साठवून घेते..गरमागरम पिळ खारी ही तिथली स्पेशालिटी...असो.)

नुसत्या उदबत्त्यांच्याच वासांच्या सेक्शनचे माझ्या डोक्यात हजार कप्पे आहेत...आमची फेव्हरेट पंढरपूरची ओली मसालावाली 'डेक्कन क्वीन' अगरबत्ती...सोलापूरच्या 'पुणेकर कामठे रसपानगृहा'त बाबा जातात ते उसाचा रस प्यायला आणि मी तिथल्या खास उदबत्तीचा वास घ्यायला..कधी तरी अचानक कुठून तरी वास येतो..तो असतो डिट्टो आमच्या आहेरगावच्या अंधाऱ्या देवघरात आजीनं लावलेल्या उदबत्तीचा...वास धूपाचा-उदाचा, मुसलमान फकीर जाळतात तो स्पेशल धूप वेगळाच...

गंधवृत्ती जागृत असल्या की जसे उत्तम वास लगेच जाणवतात तसंच दुर्गंधांचा त्रासही लगेच होतो...भरभरुन वाहणाऱ्या कचरापेट्या, गटारं, खिडक्या-दरवाजे बंद करुन ठेवणारी कोंदट घरं...मुळ्या-शेपूचा उग्र वास, अंडा आम्लेट, माशांच्या टोपलीचा मला सहन न होणारा वास...यड्यासारखे उग्र वासाचे डिओ-स्प्रे-सेंट फवारणारे लोक, सार्वजनिक जागी सिगरेटी फुकून दुसऱ्याचा जीव नकोसा करणारे लोक नकोसे होतात...जाऊ दे वाईट आठवणी नको काढायला...

गंधांच्या लिंक फार स्ट्राँग असतात...बऱ्याचदा त्या आठवणी घेऊनच येतात....

6 comments:

  1. आपल्या वेळा खरंच जुळतात की काय असं वाटायला लागलंय.
    कालपासून गंध याच विषयावर काही ओळी डोक्यात घोळताहेत. त्या लिहून ठेवायला हव्या असं बजावत असताना ही पोस्ट वाचली. छान आहे पोस्ट.

    ReplyDelete
    Replies
    1. :)वेळाच नाही, यावेळेला तर विषयपण!....लिहून टाक की मग...थ्यांकू.

      Delete
  2. अप्रतिम....

    "गंधांच्या लिंक फार स्ट्राँग असतात.." हे वाक्य खरच पटलं बुवा मला....

    ReplyDelete
  3. नामदेव, थँक्स..:)

    ReplyDelete
  4. Great!! Nice emotions with nice details.

    ReplyDelete
  5. आवडल्या गंधांच्या लिंक्स ..

    ReplyDelete