Saturday, January 9, 2010

सुनीताबाईविषयी - अंतर्नाद जाने . १०


' अंतर्नाद ' चा जानेवारी २०१० चा अंक जवळ - जवळ ' सुनीताबाई देशपांडे ' स्मृती विशेषांक म्हणता येईल . मंगला गोडबोलेंचा ' लखलखीत ' , प्रा. मिलिंद जोशींचा आणि सर्वोत्तम ठाकूरांचा असे तीन स्मृतिपर लेख आहेत .
यातला मला सर्वात आवडला तो - सुनिताबाईंच्या भावाचा - सर्वोत्तम ठाकूर यांचा ' आमची माई ' नावाचा लेख . लेख खरंच फार अप्रतिम आहे . ' सुनीताबाई ' नावाची कसली तेजशलाका होती - ते दाखवणारा !
त्यांच्या लहानपणाच्या आठवणींपासून -त्या कशा ४२ चा लढ्यात भाग घ्यायला बाहेर पडल्या , कायम स्वकष्टार्जित जीवन कशा जगत होत्या , कवितांवरचं प्रेम , भाईंच्या साहित्याचं documentation आणि perfection .अशा कितीतरी गोष्टी - काही लेखातलच उद्धृत करते .-
'' रत्नागिरीच्या पटवर्धन शाळेत माई शिकली .त्या शाळेवर तिचा खूप जीव होता .शाळेला १०० वर्षं पूर्ण होताना निधी जमवण्यात येत होता.तेंव्हा माईनं ताबडतोब एक वैयक्तिक धनादेश पाठवला - तो कुठल्याही दालनाला स्वतःचं नाव द्यावं म्हणून तो नव्हता .तो प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी आणि सोयींसाठी दिला होता ,इतर वेळेला दिलेल्या देणग्यात कुठंही आपलं नाव येऊ नये ,म्हणून सदैव दक्ष असणाऱ्या माईनं यावेळी मात्र आपल्या देणगीचा उल्लेख करणारा फलक लावायला सांगितला - हे पाहून दुसरेही देणगी देतील म्हणून , आणि घडलंही तसंच !
'' अशीच जगावेगळी वाटणारी मदत माईनं डॉ. प्रकाश आमटेंना पाठवली होती . हेमलकशाच्या त्यांच्या प्रकल्पात अनेक दुर्मिळ प्राणी आहेत -वाघ , साळीदर ,घुबडं इ. त्यांना सांभाळताना काही वेळा शासनानेही हे 'कृत्य बेकायदेशीर आहे ' असं म्हणून नोटीसा पाठवल्या होत्या . ' मानवेतर प्राण्यांच्या संगोपनासाठी ' म्हणून माईनं ५ लाख रुपयांची मदत पाठवली होती ."
'खरया गरजेला पुरेशी मदत ' हा दंडक असणाऱ्या सुनीताबाई , मदत देताना सखोल चौकशी करत .'पु. ल. देशपांडे फौंडेशन' , शेवटी विश्वस्त तित्यक्याच आपुलकीनं आणि काटेकोरपणे चालवतील; की नाही , ही शंका आल्यानं शेवटी त्यांनी ते फौंडेशन विलेपार्लेच्या 'लोकमान्य सेवा संघ' या विश्वासू संस्थेत विलीन केलं .
''प्रत्येक काम परिपूर्ण आणि सुंदर असावं , याविषयी माई दक्ष असायची .एकदा पाहुणे आलेले असताना , आम्ही डाळिंब सोलून देत होतो . दाण्यांवर जराही पातळ , पांढरा पापुद्रा राहू नये ,असं काळजीपूर्वक आम्हां दोघांचं काम सुरु होतं . मी कंटाळलो , पाहुणे दाणे न बघताच तोंडात टाकतील . मग इतका त्रास कशाला घ्या ? अशी कुरकुर केली . तेंव्हा माई म्हणाली ' मी डाळिंब हे असं सोलते , ते पाहून कुणी 'व्वा !' म्हणावं म्हणून नाही . दाण्यांना थोडीशीही साल असलेले दाणे , मला इतरांना द्यायला आवडणार नाहीत .मी दिलेली कोणतीही गोष्ट खराब असू नये असं मला वाटतं .' माईनं हे जन्मभर जपलं. ''
रद्दीवाल्या बाईसोबतचा किस्साही वाचण्याजोगा आहे , सगळच सांगत बसत नाही . लेख मिळवून तुम्ही वाचा . एक अत्रेंच्या शब्दात म्हणावसं वाटतंय ,'' असली जोडी गेल्या १० हजार वर्षात झाली नाही , आणि पुढच्या १० हजार वर्षात व्हायची शक्यता नाही !! ''.

9 comments:

  1. 'अंतर्नाद'चा अंक बघितल्यानंतर विकत घ्यायचा विचार केला होता. आता परत तोच विचार करतो. थोडं एक लक्षात आलं म्हणून लिहितो, शेवटचं वाक्य पुल आणि सुनीताबाईंविषयी आहे पण वर सगळं फक्त सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वासंबंधीच आहे. मग शेवटंच वाक्य एकदम घुसल्यासारखं वाटतंय, बहुतेक. हे वैयक्तिक मत. बाकी सगळं चांगलं. अजून एक चांगलं हे की, blogging मध्ये रुळलीस. रुळून राहा.

    ReplyDelete
  2. अवधूत , धन्यवाद . ' वैयक्तिक ' मत तसं पटण्याजोगं आहे -झालं काय अगोदरपासून पु .ल .आवडतातच , त्यामुळे विचार करताना मी त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं काढूच शकत नाही , अर्थात हे वाचणाऱ्याला कसं कळणार म्हणा ? आणि हो विचार कृतीत आण , ' अंतर्नाद ' नक्की घे , की मी देऊ ?

    ReplyDelete
  3. 'अगोदरपासून पु .ल .आवडतातच , ... अर्थात हे वाचणाऱ्याला कसं कळणार म्हणा ?'

    एका मराठी वाचकाला पु ल आवडतात यात वाचणार्‍याला न कळण्यासारखं काय आहे? शेवटचं वाक्य अजिबात एकदम घुसल्यासारखं वाटत नाही.

    तुमच्या एका ज़ुन्या लेखात 'देव जीर्ण होतो का' हा प्रश्न, आणि 'या देशात देवाकडेच लक्ष देतात, माणसाकडे लक्ष द्‌यायला कोणाला वेळ नाही' अशी टीका आहे. जीर्णोद्‌धार देवाचा कधीच करत नाही, देवस्थानाचा करतात. देवाची पुनर्स्थापना होते तेव्हाही 'देव सगळीकडे, सर्वकाळ नसतो का' हा प्रश्न लागू होत नाही, कारण प्रतिष्ठापना / पुनर्स्थापना वगैरे गोष्टी मूर्तीशी आणि उत्सवाशी संबंधित असतात. मशीदीत परमेश्वराची प्रतिमा नको म्हणतानाही मशीदीच्या रूपात एका धर्मकल्पनेची प्रतिमा बसवल्या ज़ातेच. मी ज़वळज़वळ नास्तिक, थोडा मतलबापुरता आस्तिक, आहे. पण तुमच्या कळकळीचा विषय असलेला पिचलेला माणूस देवाच्या कल्पनेपासून आधार मिळवत असेल तर काय हरकत आहे? तुम्ही एक किस्सा ऐकला असणारच. एकदा एका सुधारकानी तावातावात ईश्वराविरुद्‌ध बुद्‌धीला पटणारे ताशेरे ओढले. त्याच्या भाषणाआधी आचार्य अत्रे त्याला म्हणाले: कृपा करून तुमचे युक्तीवाद खेड्यातल्या निरक्षरांपुढे करू नका. या लोकांना त्यांच्या दारिद्‌र्‍यात बुद्‌धीवादापेक्षा श्रद्‌धेचा आधार असतो.

    बाकी देवापुढे ज़ोरज़ोरात गाणी लावून लोकांना त्रास देणे वगैरे प्रकार बंद पाडले पाहिजेत, हे खरं आहे.

    शेवटी परत सुनीताबाई देशपांडे. एका प्रयोगशाळेला मदत करतानाही त्यांनी खूप प्राचीन काळीच सूक्ष्म कणांपासून वस्तू घडतात हे ओळखलेल्या कणादाचं नाव देण्याचा आग्रह धरला होता.

    ReplyDelete
  4. नानिवडेकर , पहिल्यांदा ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हांला उत्तर द्यायला वेळ लागल्याबद्दल sorry .
    अवधूतचं मत मला 'तसं ' पटलंय म्हणलं मी नानिवडेकर ! दुसरं , ' पिचलेल्या ' च काय कुठल्याही माणसांना देवाचा आधार वाटत असेल तर त्यांनी तो जरूर घ्यावा , फक्त 'देव' संकल्पनेच्या नावाखाली कुणाचं exploitation होऊ नये असं मला मनापासून वाटतं . शिवाय मतलबापुरता 'देव' मानण्याचं 'चातुर्य' किंवा शहाणेसुरतेपण म्हणा , सर्वसामान्य माणसाकडे नसतं हो !
    तिसरं , जीर्णोद्धार देवळाचा करतात , हे कुणीतरी सांगण्याची मी वाट पाहत होतेच .
    पुन्हा धन्यवाद !

    ReplyDelete
  5. > "माईनं हे जन्मभर जपलं - पण त्याचा दुसऱ्या कुणाला त्रास होऊ दिला नाही."
    >----

    बन्सोडे बाई (की बन्सोड?, माझा एक मित्र आहे 'बन्सोड') : आपल्या आग्रही वर्तनामुळे इतरांना कसा त्रास होतो, याचं वर्णन सुनीताबाई देशपांडे यांनी स्वत: वेळोवेळी केलं आहे. असं असूनही त्यांच्या शिस्तीला असं अवाज़वी गोंडस रूप देण्याचा प्रयत्न का होतो, मला कळत नाही. म्हणजे ते वाक्य तुम्ही लिहिलेलं नाही, पण इथे पेश केलेल्या भागात तेवढं एक वाक्य (तुमच्याकडून त्याचा स्वीकार होऊन) आलं नसतं, तर ते चित्र यथार्थ दिसलं असतं.


    > असली जोडी गेल्या १० हजार वर्षात झाली नाही , आणि पुढच्या १० हजार वर्षात व्हायची शक्यता नाही !
    >----

    ही सुद्‌धा अतिशयोक्ती. इथे अतिशयोक्ती हा अलंकार राहत नाही. सुनीताबाईंसारखे गुण असलेल्या बायका गल्लीबोळात दिसत नाहीत, पण त्या इतक्या दुर्मिळही नाहीत. त्यांच्या नवर्‍यानी पराक्रम गाज़वला नसता, तर सुनीताबाई कदाचित कायमच अज्ञात राहिल्या असत्या. आणि लेखक म्हणून पु ल आज़पासून पन्नास वर्षांनी कितपत लक्षात राहतील, हे सांगता येत नाही. दोनशे वर्षांनंतरचं तर काहीच सांगता येत नाही. 'खरे युगप्रवर्तक कवि म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकाराम. तुमची आमची युगं ५-१० वर्षांच्या लांबीची', असं बोरकर म्हणाले होतं. ही अतिशयोक्तीची समर्पक योजना झाली.

    - डी एन

    ReplyDelete
  6. जगातल्या कुठल्या perfectionist माणसाला शिव्या चुकल्यात , नानिवडेकर ? तरीपण त्यांना उगाचच गोंडस बनवणं , सुनीताबाईना स्वतःलाही आवडलं नसतं बहुतेक ! म्हणून ते वाक्य तुमच्या सूचनेप्रमाणे काढून टाकलं आहे , आता ब्लॉग 'यथार्थ ' झाला का, ते सांगा .
    तुमचं दुसरं मत मात्र मला पटलं नाही .सुनीताबाईमध्ये असणारे एकेक गुण , म्हणजे व्यवस्थितपणा , प्रामाणिकपणा असे एकेक काही बायकांमध्ये नक्कीच आढळतील , पण त्या सगळ्या गुणांचा समुच्चय आढळणार ' माणूस ' मला दुर्मिळच वाटतं .बाकी बायकांच्या कर्तुत्वाची नोंद घेताना कंजुषी दाखवली जाते , हे तर खरंच खरं !
    शेवटी जाता जाता मी ' बनसोडे 'च आहे , बन्सोड नाही . तुमच्या सूचना आणि comment पुढेही वाचायला नक्की आवडतील . धन्यवाद .

    ReplyDelete
  7. > आता ब्लॉग 'यथार्थ ' झाला का, ते सांगा .
    >
    मी *चित्र* यथार्थ आहे की नाही याबद्‌दल बोलत होतो. आता त्यातली अतिशयोक्ती काढल्या गेली, हे छान झालं. तुमच्या ब्लॉगची यथार्थता वगैरे ठरवण्याची आपल्यात काही पात्रता नाही.

    > त्या सगळ्या गुणांचा समुच्चय आढळणार ' माणूस ' मला दुर्मिळच वाटतं
    >---

    इतकी गुणी बाई बरीच दुर्मिळ आहे, हे आधीच मान्य केलेलं आहे.


    > बाकी बायकांच्या कर्तुत्वाची नोंद घेताना कंजुषी दाखवली जाते , हे तर खरंच खरं !
    >----
    मी लिहिलं होतं : 'पु ल आज़पासून पन्नास वर्षांनी कितपत लक्षात राहतील'. ही पु लं च्या, म्हणजे पुरुषाच्या, कर्तृत्वाची नोंद घेताना केलेली कंजूषी आहे, आणि ती माझी शंका कायम आहे. पण मी (फक्त) बाईच्या कर्तृत्वाची नोंद घेताना आखूडपणा केला आणि तो ही ती व्यक्ती स्त्री होती म्हणून, हा ठाम निष्कर्ष काढून तुम्ही आधीच मोकळ्या झाल्या असल्याने मी त्याबद्‌दल काहीही करू शकत नाही.

    - डी एन

    ReplyDelete
  8. ''त्यांच्या नवर्‍यानी पराक्रम गाज़वला नसता, तर सुनीताबाई कदाचित कायमच अज्ञात राहिल्या असत्या....'' : या तुमच्याच विधानावरून मी बायकांच्या गुणाबद्दलच्या कौतुकाच्या 'कंजुषी 'बद्दल , काही म्हटलं होतं . मी तुमच्या कंजुषीबद्दल काही बोललीय , असं मला अजिबात वाटत नाही .
    बाकी ज्ञानेश्वर , तुकाराम , बा. भ. , पु. ल. इ. सारे जण किती वर्षं लक्षात ठेवले जातील - यावर अवाक्षर काढण्याबाबत माझी 'आपल्या इतकीही ' पात्रता नाही .फक्त हे सारे छोट्या माणसांच्या जगण्याला मोठा अर्थ देतात, एव्हढ आपलं मला वाटतं .
    हो , आणि आता उगाचच ' वाद ' घालायचा मला कंटाळा आलाय .

    ReplyDelete
  9. बनसोडे बाई : तुम्हाला हा वाद कंटाळवाणा वाटत असेल (फक्त ८ टिप्पण्यानंतर) तर त्याला माझा नाइलाज़ आहे. 'त्यांच्या नवर्‍यानी पराक्रम गाज़वला नसता, तर सुनीताबाई कदाचित कायमच अज्ञात राहिल्या असत्या....' यात काहीही कंजूषी नाही. एरवी स्वत:च्या बळावर प्रसिद्‌ध होण्याचा एकच मार्ग सुनीताबाईंना दिसतो, आणि तो म्हणजे लेखिका म्हणून. आणि निव्वळ लेखिका म्हणून त्यांच्याबद्‌दल आता होते तितकी चर्चा अजिबात झाली नसती. भरपूर दानधर्म करावा इतका पैसाही त्यांना मिळण्याची शक्यता कमीच होती.

    'तुमच्या कंजुषीबद्दल काही बोललीय .. नाही' -> माझ्या विधानात तुम्हाला कंजूषी दिसली, याला हरकत नाही. मी त्यावर माझी बाज़ू मांडली. 'माझ्या विधानातली कंजूषी' आणि 'माझी कंजूषी' असे काही दोन वेगळे प्रकार नाहीत.

    ReplyDelete