Wednesday, December 23, 2009

त्या वर्षी - शांता गोखले

शांता गोखलेंची ' त्या वर्षी ' वाचली . बरीच आवडली . मला ' रीटा वेलिणकर ' पेक्षा ही जास्त आवडली .
एकूणच कलाकारांच्या आयुष्याबद्दल ही कादंबरी आहे , पण जोडीला 'तत्वनिष्ठा' प्राणपणाने जोपासणारे आणि ' अधःपतीत ' लोक , जगात घडणाऱ्या अनेक घटनांचा संवेदनशील माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम असं बरंच काही आहे . महत्त्वाचं म्हणजे कादंबरी कुठेही मेलोड्रामाटिक होत नाही , आणि सगळ्यात उत्तम परिणाम ( माझ्या मते ) याच गोष्टीचा झालाय . ( यामुळेच अनेक गोष्टी अगदी अंगावर आल्या उदा . ' काळ पहिला रे सख्या ' किंवा झुंडीनं घेतलेला सिद्धार्थचा बळी )
कादंबरीत वेगवेगळ्या पार्श्वभूमीची अनेक माणसं आहेत . शिक्षिका असणारी अनिमा , तिचा चित्रकार भाऊ अशेष , चित्रकार असणारे हरिदास , फिरोझ , पत्रकार जानकी, गायिका शारदा आणि तिचा नवरा शेखर . मला वाटतंय या कादंबरीला रुढार्थानं नायक / नायिका नाही - अगदी ठरवायचंच झालं तर ' काळ / नियती ' यांना मुख्य पात्र म्हणता येईल . या शिवाय अविवाहित राहून समाजसेवा करणारे बच्चुकाका , गांधी मंदिर उभारणारे अनिमाचे बाबा , गिरजी , पत्र १० वर्षं जपून ठेवणारा रामा सगळे कुठंतरी मनात घट्ट जाऊन बसलेत .
कादंबरीत अनेक संदर्भ येतात - आणि ते ज्या सहजपणानं शांताबाईनी गुंफलेत त्या बाबत तर hats off ! सनातनवाल्यांच्या कारवायांपासून , एम . एफ . हुसैनच्या चित्रावरील हल्ल्यापर्यंत आणि समलिंगी संबंधांपासून ते 'एलिट क्लास 'च्या पार्ट्यापर्यंत अनेक गोष्टी येतात . दुसरा कोणी लेखक असता तर . कदाचित ही ' ठिगळं ' च वाटली असती !
या कादंबरीत मला अनेक ' जागा ' सापडल्या - गाण्यात आपण दाद देतो ना अगदी तशा !
गांधी मंदिर पाडणं - आणि अनेक घटनांचा संदर्भ - जमावापुढे कोणीच काही करू शकत नाही , हाच असला तरी त्याचा त्रास होत होता .
इंग्लिशमध्ये ' sarcastic ' म्हणतात तो विनोद खूप ठिकाणी आहे .
शिवाय - जग राक्षसांच्या हाती गेल्यावर कलाकार काय करू शकतो ? - माणूस म्हणून आपल्यात काही सृजनशक्ती उरली आहे का - हे शोधून ती एकवटून निर्मिती करत राहणं - बस्स ! - हे भारी आहे !!
थोड्या खटकलेल्या गोष्टी - अनिमा , अशेष ही नावं आपल्या रोजच्या परिचयाची नाहीत ( पुढे अर्थात नावांचा संदर्भ येतोय ) , म्हणून नव्यानं वाचणार्याला ती दूर नेतील असं वाटतंय . कादंबरी कधी - कधी फारच ideologostic वाटते .
आणि मागे अवधूतनं सांगितलेलं - सांस्कृतिक सपाटीकरण पाहायला मिळालं , कारण या कादंबरीतली अनिमा जोशीसकट - जानकी पाटील , फिरोझ
बानातवाला हा पारशी इ. सारेजण ' केल्येय , गेल्येय !' असं कोकणस्थी बोलतात - ते थोडं मजेशीर वाटलं - बाकी पुस्तक झक्कास ! नक्की वाचा .
( ही कादंबरी शांता गोखलेंनी एका दीर्घ आजारात लिहिलीय - असं प्रस्तावनेत आलंय - पुन्हा एकदा बाई ( बापमाणूस आहे असं म्हणावसं वाटतंय ) Great ! )

8 comments:

 1. परवा भारी वाटलेल्या गोष्टीचा आज पुनर्विचार करावासा वाटतोय - जग राक्षसांच्या हाती गेल्यावर माणसानं निर्मिती करत बसायची ? कशाला ? राक्षसांना ती उद्ध्वस्त करता यावी म्हणून ? यापेक्षा आप - आपल्या परीनं राक्षसांशी लढणं बरं की काय ? छे , आता काहीच नीट कळत नाहीये .

  ReplyDelete
 2. आयला! प्रश्न भारी विचारालायस. पण एवढी वैचारिक चर्चा आपल्याला जमत नाही ब्वा. उत्तर त्या प्रश्नातंच दडलंय, असं काहीतरी निरर्थक लिहून ठेवतो.

  ReplyDelete
 3. चांगला रसास्वाद आहे. परंतु काळ किंवा नियती मुख्य पात्र आहे असे वाटत नाही. कादंबरी इतकी पराधीन नाही वाटली.

  ReplyDelete
 4. शंभराव्या , धन्यवाद . आणि ' कादंबरीची पराधीनता ' अरे बापरे !!

  ReplyDelete
 5. मला खूप आवडतं हे पुस्तक...आणि यावरचं तुमचं हे विश्लेषण भावलं..
  माहित नाही का,पण दरवेळी हे पुस्तक वाचताना हुरुहूर आणि भारावून जायला होतं.. :)
  पण नेट जगतात कोणीतरी या कादंबरीबद्दल लिहिलंय यासाठी भलता आनंद झाला मला.. :D..नाहीतर कुठेच वाचायला मिळालं नाही त्याबद्दल..

  ReplyDelete
 6. प्राजक्ता,
  मन:पूर्वक आभार....मी पण लईच भारावले होते, हे पुस्तक वाचून.आणि मला ही खूप आनंद झाला पहाटे साडेचारला यावरची तुमची प्रतिक्रिया पाहून..

  ReplyDelete
 7. शांता गोखल्यांबद्दल 'रीटा वेलिणकर'च्या लेखिका ह्या पलिकडे काहीही माहित नसताना 'त्या वर्षी' सरळ विकत आणून वाचली. रीटा वेलिणकर अजूनही वाचलेली नाही.
  नियती हे मुख्य पात्र नाही तर प्रत्येक पात्रात ठायीठायी दिसणारी आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने आविष्कृत होणारी संवेदनशीलता (अगदी ठरवायचंच असेल तर) मुख्य ठरू शकते.
  बाकी ह्या कोकणस्थी बोलीचा मुद्दा लक्षात आला नव्हता. कदाचित परिणाम एकसंध व्हायला बोलीभाषेचं लिखित स्वरूप 'केल्येय गेल्येय' द्वारे स्टॅण्डर्डाईज केलं असावं.
  कादंबरी अर्थातच आवडती!

  ReplyDelete
 8. @ आल्हाद धन्यवाद....बाकी 'त्या वर्षी' बाबत संवेदनशीलतेचा मुद्दा खराच आहे .

  ReplyDelete