Monday, December 7, 2009

लेडी लंपन - इओ .

प्रकाश नारायण संतांच्या लंपनच्या तशी मी प्रेमात आहेच . पण परवा एक रशियन कथा वाचताना , अचानक मला ' लेडी लंपन ' भेटली .( खरतर १६ वर्ष या तिच्या वयाला ' लेडी ' हा शब्द न पेलवणारा ! ) व्हलेन्तिनो रास्पुतिन नावाच्या सायबेरीअन लेखकाची ही गोष्ट . ' पालकनीती ' च्या दिवाळी अंकात उज्ज्वला बर्वेंनी या कथेचा अनुवाद केला आहे .( लगेच कथा वाचण्याचं हे आणखी एक कारण ! )
कथेच नाव आहे ' रुदोल्फ़िओ ' - इओ नावाची मुलगी २८ वर्षांच्या रुदोल्फच्या प्रेमात पडते . तो तिचा ट्राममधला सहप्रवासी असतो . पहिल्याच भेटीत त्याच नाव ऐकल्यावर , खो खो हसत ती म्हणते , " रुदोल्फ - मला वाटत असल नाव फक्त हत्तीच ठेवत असतील " . इओचा धीटपणा , निरागसता , मोठ्या लोकांप्रमाणे प्रसंगाला साजेस न वागता - मनातल बोलून टाकण्याची सवय सारच मुळातून वाचण्यासारख आहे . उदा . रुदोल्फच्या बायकोच नाव ऐकल्यावर ती झटकन म्हणते " क्लाव्हां - भुईला भारय नुसती " किंवा पहाटे ५ वाजता फोन करून ती त्याला सांगते - '' आता तुझ नाव ' रुदोल्फ़िओ ' - आता आपण एकत्र झालो तू पण ' रुदोल्फ़िओ ' आणि मी पण ' रुदोल्फ़िओ ' ! " किंवा " तिला सांगू नकोस हं - मी इथे आले होते ते , मला वाटतंय तिला माझा हेवा वाटतो "
आणि शेवटच , दोन्ही पायांना घट्ट मिठी मारून , पलंगावर मागे -पुढे झुलत , रागाने - " तू कसला ' रुदोल्फ़िओ ' ? तू तर नुसता रुदोल्फ ; साधा , अतिसामान्य रुदोल्फ !! " या कथेतला रुदोल्फ ही खूप समजूतदार , सभ्य माणूस दाखवलाय . साम्यवाद्यांच्या रशियाची इतकी हळवी , कोवळी बाजू - माझ्या साठी नवीच होती .
सगळ्यात महत्त्वाच म्हणजे पोरवयातल्या वेड्या प्रेमाची , मुलीची असलेली कथा मी पहिल्यांदाच वाचली आणि मला ती ' जाम ' आवडली .
ता . क . कोणालाही ही कथा ऐकायची असेल तर मी उत्सुक आहे - सांगायला !

No comments:

Post a Comment