Monday, November 23, 2009

देवांचं नशीब सध्या जोरावर !

आमच्या जुन्या गल्लीतले सारेच देव भाग्यवान आहेत ! बहुधा त्या गल्लीत आपल्याला जागा मिळावी म्हणून देवादेवात स्पर्धाही लागत असेल . तर त्या गल्लीतल्या स्वामी समर्थांवर सध्या भक्तांचीच कृपा झालीय .( 'जीर्णोद्धार' हा शब्द ही या दृष्टीने विचारात घेण्याजोगा ! देवही जीर्ण होतो की काय?) मी सुरुवातीला जेव्हा तिथे राहायला गेले तेंव्हाच , ते छोट मंदिर आठवतंय - त्या मंदिरात कुणी दिवा लावायलाही चुकूनच यायचं . रस्त्यान जाणारे नमस्कार वगैरेही करत नसतील . अचानक या मंदिराचं भाग्य फळफळल . नक्कीच कुणाचातरी नवस पूर्ण झाला असावा - स्वामी समर्थांना दररोज भरजरी पोशाख , समोर समई , धूप , बल्ब लागला . गाणी सुद्धा लागायला लागली , कदाचित एखादा पुजारीही नेमला गेला असेल . एकदा तर तिथं ' अन्नकोट ' उत्सवही झाला . एकूणच जाणारे येणारे दखल घेऊ लागले .
अर्थात या गल्लीतला म्हसोबा जास्त भाग्यवान आहे . त्याच्या नावे चार दिवसांचा उत्सव भरला होता , २० साउंड डेकची मोठी भिंतच उभारली होती. फुलांच्या मोठ्या कमानी , नाचायला आली होती ' प्रसिद्ध सिनेतारका दीपाली सय्यद ' , शिवाय नगरसेवकाच्या हस्ते आरत्या , पाककृती स्पर्धा , विविध गुणदर्शन अशी 'जंगी' सांस्कृतिक मेजवानी (?) होती . देव मात्र छोटासा , शेंदूर फासून कोपऱ्यात ठेवलेला !

2 comments:

  1. माझ्या नेहमीच्या पाहण्यातही अशी एकदोन लहान (सध्या लहान आहेत,अशीच प्रगती राहिली तर खूप मोठी होतील) मंदीरं आहेत, जिथं आधी देव दुर्लक्षित होते पण आता त्यांचा भाव चांगलाच वधारलाय. भगव्या टोप्या घातलेले दोन आजोबा असतात, दररोज, आरतीच्या वेळी घंटा वाजवायला.

    ReplyDelete
  2. प्रश्न हाच आहे ना सुगंधा , या देशात देवाचं नशीब झटकन उघडत - देवळांची प्रगती होते , २० - २० वर्षे देवस्थानांचे अहवाल चघळले जातात - माणसाच्या प्रश्नाकडे मात्र क्वचितच कुणाच लक्ष जात .

    ReplyDelete